नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्याआधी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फक्त पंतप्रधानच नव्हे तर पंजाब पोलिसांसह १० नेतेही यावेळेस दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे अधिकच खबरदारी घेतली जात आहे. २४ ऑगस्टला पंतप्रधान पंजाबमधील मोहाली येथे टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या उदघाटनासाठी येणार आहेत.
मोहाली शहरातील सर्व प्रमुख ठिकाणे लक्ष्य केली जाण्याची शक्यता आहे. शहरातील बसस्थानके, सर्वच प्रमुख इमारती यावेळेस रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाब पोलिसांनी कॅनेडियन गँगस्टर अर्श दल्ला याच्याशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यामुळे यावेळेस धोक्याची शक्यता अधिक आहे. पंतप्रधानांसह पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर रांधवा हेही दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत.