काबुल: अल - कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिका लष्कराच्या ड्रोन हल्ल्यातून ठार करण्यात आले. याबाबत अमेरिका प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. अल जवाहिरी हा इजिप्तचा शाल्यविशारद होता. पुढे जाऊन तो दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल कायदाच्या संपर्कात आला. अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी अल जवाहिरी एक होता.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात ३००० लोक मृत्युमुखी झाले होते. अमेरिकेने जवाहिरी याच्यावर २५ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर जवाहिरी संघटनेची जबाबदारी पाहत होता. यानंतर जवाहिरी पाकिस्तानात लपला होता. त्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर तो काबुल शहरात आला. तालिबानचे गृहमंत्री व कुख्यात दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी यांनी त्यांच्या सुरक्षित व गुप्त ठिकाणी जवाहिरीला राहण्यासाठी जागा दिली होती. अमेरिकेन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवाहिरीला वांरवांर त्याच्या घराच्या बाल्कनीत फिरण्याची सवय होती आणि तीच सवय त्याला महागात पडली.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या अधिकाऱ्यांना जवाहिरी काबुलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी व्हाइट हाऊसला ही माहिती पोहचवली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानंतर जवाहिरीच्या एन्काउंटरचा कट रचण्यात आला. सीआयएने रिपर ड्रोनमधून हेलफायर मिसाइल जवाहिरीवर डागले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मुलगा व जावई यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. जवाहिरीचे वय मृत्यूसमयी ७१ वर्षांचे होते.
अमेरिकी लष्कराच्या या हल्ल्यात जवाहिरीचे कुटुंब सुरक्षित आहेत. या हल्ल्याबाबत अमेरिकेने तालिबानला कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे माहिती मिळताच तालिबानचा प्रवक्ता जबीहउल्लाह मुजाहिदने हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेने केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन असल्याचं त्याने म्हंटले आहे.