कोल्हापूर विमानतळाचे नवीन टर्मिनल मार्च २०२३ पर्यंत होणार पूर्ण
19-Aug-2022
Total Views |
मुंबई: महाराष्ट्रातील कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत मार्च २०२३ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, सध्या ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एअरसाईड सुविधा अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यातील वाहतूक वाढीसाठी एक नवीन हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर देखील बांधला जात आहे. शंभरहून अधिक कार आणि दहा बसेसची क्षमता असलेले पार्किंग क्षेत्र देखील विकास उपक्रमांचा भाग आहे. कोल्हापूर विमानतळावरील प्रचंड प्रवासी वाहतूक वाढ लक्षात घेऊन, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या वाढीव क्षमतेसाठी विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
या संपूर्ण विकास प्रकल्पात नवीन टर्मिनल इमारत बांधणे, विद्यमान धावपट्टी मजबूत करणे, धावपट्टीचा विस्तार करणे, नवीन ऍप्रन आणि आयसोलेशन बे बांधणे. समाविष्ट आहे. नवीन टर्मिनल इमारत ही चार हजार चौरस मीटर क्षेत्रात बांधली जात आहे आणि गर्दीच्या वेळी ३०० प्रवाशांना वाहण्यास सक्षम असेल. हे टर्मिनल दहा चेक-इन काउंटरसह सर्व आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असेल. ही इमारत शाश्वत वैशिष्ट्यांसह 'फोर-स्टार ग्रिहा-रेटेड' 'ऊर्जा-कार्यक्षम' इमारत असेल. “विमानतळाच्या नवीन जागतिक दर्जाच्या टर्मिनल इमारतीमुळे कोल्हापूरशी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या भागातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल,” असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
नवीन टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावरील महाकाय तोरण हे कोल्हापूर शहरातील महाराजा पॅलेस, भवानी मंडप आणि पन्हाळा किल्ला या वारसा वास्तूंच्या स्थापत्यातूनप्रेरित असेल.कोल्हापूर विमानतळ उदान योजनेंतर्गत ओळखले गेले आहे. आणि सध्या हैदराबाद, बंगलोर, मुंबई आणि तिरुपतीशी जोडलेले आहे. अलीकडेच या विमानतळाला सात दिवस २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे. हे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पूर्वीच्या राजघराण्यांच्या शाही ठिकाणांसाठी ओळखले जाणारे शहर आहे.