नवी दिल्ली : ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणण्याच्या मागे लागले आहेत. गेले अनेक दिवस नवे मुद्दे घेत सोशल मिडीयावर ते बॉलीवूडवर टीकास्त्र सोडत आहेत. आमीर खाननंतर आता त्यांचा मोर्चा आता अनुराग कश्यपकडे वळला आहे. विवेक अग्निहोत्री अनुराग संदर्भात एक ट्विट करून बॉलिवूडचा छुपा अजेंडा सांगितला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने RRR चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. त्याच्या मते यंदाच्यावर्षी भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून जर RRR या चित्रपटाला पाठवलं तर त्याला ९९% नामांकन मिळू शकतं. शिवाय ज्यापद्धतीने भारतीय प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यापेक्षा अधिक वेगळ्या दृष्टीकोनातून परदेशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे. अनुरागच्या या विधानामुळे सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉट घेत ट्विटरवर म्हटले आहे की, “ज्या लोकांनी काश्मीरी पंडितांचा नरसंहार झालाच नाही असेम्हटले आहे, ते लोक आता RRR ऑस्करला जावा यासाठी प्रचार करत आहेत.” यामध्ये अनुरागच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’चाही उल्लेख आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता, तो अपेक्षेपेक्षा जास्त चालला होता; त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट ऑस्करला जावा असं वाटत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. आणि म्हणून ते त्यांनी अनुरागच्या वक्तव्यावर टीका केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय विवेक अग्निहोत्री यांनी सध्या बॉलिवूड विरोधात मोहिम सुरु केल्यासारखे ट्विट करत आहेत, असेही काही युजर्स प्रतिक्रिया देत आहेत.