ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा

    17-Aug-2022
Total Views | 126
santa tukaram
 
परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्ताकडून समाजाला कधीही उपद्रव होत नाही. जीवन कसे जगावे, याचा तो इतरांसाठी आदर्श असतो.
 
 
त्या सर्वोत्तम दासाचे वर्णन पुढे ठेवून समर्थ सांगतात
 
सदा सेवि आरण्य तारूण्यकाळीं।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं।
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचां।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
 
 
 
या श्लोकातील पहिल्या ओळीचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ परमार्थ साधनेसाठी लोकवस्ती, घरदार सर्व सोडून अरण्यात जाऊन राहावे, असा वाटतो. पण, ते योग्य नाही. अरण्यवासाचे सेवन करायचे म्हणजे प्रापंचिक मोह, माया, स्वार्थबुद्धी यांचा विवेकाने त्याग करणे. समर्थांनी तरुणकाळात डोंगराच्या घळीत धबधब्याच्या जवळपास निसर्गसान्निध्यात राहणे पसंत केले, पण सर्वसाधारण माणसाला समर्थांचे अनुकरण करणे शक्य होणार नाही.
 
 
 
यासाठी समर्थांना नेमके काय सांगायचे आहे, ते जाणून घेतले पाहिजे. अरण्यवासात नीळसर डोंगर, हिरवीगार झाडी, आकाशात मुक्तपणे विहार करणारे पक्षी, वाहते निर्झर असे दृश्य पाहिल्यावर आपले भान हरपते. मन वेगळ्या आनंदात तरंगू लागते. हे दृष्टीसुख अनुभवावे, यासाठी भक्त अरण्याची निवड करत नाही, तर प्रसन्न मनानेभगवद्चिंतन करता यावे, हा भक्ताचा उद्देश असतो.
 
 
 
मागे स्वामींनी श्लोेक क्र.४४ मध्ये सुखासाठी अरण्यावास पत्करावा, असे सुचवले आहे. स्वामी त्या श्लोेकात सांगतात,
 
नसे राम ते धाम सोडून द्यावे।
सुखालागि आरण्य सेवीत जावे॥
 
 
 
संत तुकाराम महाराजही आत्मोेद्धार साधनेसाठी देहू जवळील भंडारा डोंगरावर जाऊन निसर्ग सान्निध्यात जपसाधना करीत असत. तुकाराम महाराजांना त्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी। वनचरे’ असे मनापासून वाटत होते. निसर्ग सान्निध्यात प्रापंचिक सुखदु:खे विसरुन भगवंताच्या स्मरणात रममाण होता येते. भगवंताचे अस्तित्व देवळापेक्षा निसर्गात निश्चितपणे जाणवते. यासाठी भक्त तरुण वयात अरण्यातील एकांतवास पत्करतो, असे स्वामी म्हणाले. त्यामागे स्वामींचा मुख्य विचार जनसंपर्क बाजूला ठेवण्याचा आहे.
 
 
 
अरण्यातील एकांतवासात काही काळ राहून भगवंतचिंतनाने मन उन्मनी अवस्थेला पोहोचल्यावर तो भक्त जनसामान्यात परत आला, तरी लोककल्पनेचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही. साधनेच्या सुरुवातीच्या काळात लोकात वावरताना भक्ताला लोकांकडून भगवंताविषयी नाना विचित्र कल्पना ऐकायला मिळतात. कोणी म्हणतात, देवाला प्रसन्न करायचे तर त्यासाठी उपासतापास, व्रतवैकल्ये करावी. तीर्थाटने करुन शरीराला कष्ट द्यावे. या व्रताचरणात चूक झाली, तर देवाचा कोप होतो वगैरे. तसेच समाजात अनेकविध देवदेवतांना मान्यता आहे.
 
 
 
लोकांनी आपापल्या देवदेवतांचे पंथ तयार केले. जितकी दैवते तितके पंथ निर्माण झाले. प्रत्येक पंथाचा आचारविचार, भक्तिसाधना वेगळी यातून होणारे पंथीय तंट्टे, द्वेष, मत्सर, अहंकार, वाद या सार्‍यांचा विपरित परिणाम नव्याने भक्तिसाधना करायला लागणार्‍या भक्ताच्या मनावर होतो. तो संभ्रमित होतो. हे सारे अरण्यवासात टाळता येते. परंतु, भक्ताने जनसंपर्क लोकांचे विचार टाळून सारासार विवेक बुद्धीने आपले निर्णय घेतले, तर लोकात राहूनही त्याला उत्तम साधना करता येते.
 
 
 
समर्थ त्यासाठी या श्लोकात दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. (१) जनसामान्यांत अध्यात्माविषयी जो कल्पनांचा गोंधळ चाललेला आहे, त्याच्या आहारी न जाता भगवंतावरची श्रद्धा अटळ, अनिवार्य ठेवावी. (२) भगवंताविषयी जो निश्चय झाला आहे, तो दृढ करावा. तो कशानेही डळमळीत होऊ नये. भक्ताला लोकसमूहात राहूनही परमार्थ साधना करता येते, असा हा भक्त, सर्वोत्तमाचा दास खरोखर धन्य होय. भगवंताविषयी अध्यात्मज्ञानाविषयी आस्था निर्माण होऊन निश्चय दृढ झाल्यावर भक्त त्यापासून मागे फिरत नाही. अशा भक्तांची आंतरिक अवस्था म्हणजेच त्याची मानसिकता कशी असते, याचे वर्णन समर्थांनी पुढील श्लोकात केले आहे-
 
 
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपासा।
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥
 
 
  
बालकाची वृत्ती निरागस असते. निष्पाप असते. पुढे तरुणपणी आणि नंतरच्या आयुष्यात त्याचा लोकांशी संपर्क वाढतो. त्यातून स्वार्थ, लोभ, मोह यांचे त्याला आकर्षण वाटू लागतो. तशा वृत्ती बळकावतात आणि त्या विकारांच्या तृप्तीत आनंद आहे, असे त्याला वाटू लागते. त्यात तो पूर्णपणे रममाण होतो आणि खर्‍या परमार्थिक ‘विवेकविचार’युक्त समाधानाला पारखा होतो. स्वार्थादी मोह, दुःखरूप असून ते सुखाचे आच्छादन घालून जीवनात प्रवेश करतात. त्यामुळे त्यांचे स्वागत होते. मोह अनेक प्रकारांनी माणसाला भुलवतो. स्त्रीमोह, पैशांचा मोह, सत्तेचा मोह यांची माणसाला भुरळ पडते.
 
 
 
मोहविकार हे माणसाचा ताबा घेताना प्रथम त्याचा विवेक नष्ट करतात. विवेक नष्ट झाल्यावर माणूस विकारांच्या आहारी सहजपणे जातो. विकार बुद्धी भ्रष्ट करतात. मग हा माणूस मोहांपासून सुटू शकत नाही. या मोहांपैकी सत्तेचा मोह सोडणे, अत्यंत कठीण असते. हा मोह माणसाच्या सुखी-समाधानी आयुष्याचे मातेरे करतो. खरा भक्त मोहांपासून दूर असतो. भक्त निःस्वार्थी व निरिच्छ झालेला असल्याने त्यांच्या मनातून आकांक्षा दूर झालेल्या असतात.
 
 
 
भक्ताच्या मनात वृथा अहंकार नसतो. गर्व-ताठा-स्वार्थ मावळल्याने दुसर्‍याचे वाईट व्हावे, त्याचे नुकसान व्हावे, अशी दुराशा त्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. दुष्ट असुरी विकार त्याच्या मनात उत्पन्न होत नाहीत. मग त्या विकारांच्या आहारी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भक्ताच्या अंतःकरणात भगवंताचे प्रेम पुरेपूर भरलेले असते.
 
 
 
प्रेमाची उत्कट इच्छा भक्ताच्या ठिकाणी निर्माण झालेली असल्याने तो भगवंताच्या प्रेमपाशात अडकलेला असतो. भक्त आणि भगवंत एकरूप झाल्याने त्यांचे परस्परावर प्रेम जडते. सख्यभक्तीचे हे परमलक्षण मानलेले आहे. सर्वसाधारणपणे भक्त देवाचे ऋण मान्य करून त्याच्या ठिकाणी कृतज्ञ असतो, पण या भक्तीची थोरवी अशी की, भक्ताच्या प्रेमभावाने भगवंतच त्याचा ऋणी होतो. हा भगवंताचा भक्त दुर्मीळ असतो, तो संत असतो, असा हा सर्वोत्तमाचा दास खरोखर धन्य होय.
 
 
 
- सुरेश जाखडी  
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121