खाकीतील ‘वीरश्री’

    17-Aug-2022
Total Views |
shital kharatmal
 
बालपणी आईने सांगितलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी ऐकून क्रीडाक्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणारी खाकीतील वीरता अर्थात ठाणे पोलीस दलातील महिला कर्मचारी शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांची ही गौरवगाथा...
ज्युडो मार्शल आर्ट’मध्ये ठाणे शहरासह भारताचा डंका जगभरात गाजविणार्‍या शीतल खरटमल यांचा जन्म सोलापूर शहरात झाला. वडील पोलीस खात्यात असल्याने बालपण पोलीस वसाहतीमध्ये यथातथाच गेले. श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे सोलापूरच्या शाळेत पुढील शिक्षणाचे धडे गिरवले. त्यावेळी शाळेत मागासर्गीयांसाठी प्रवेश देण्यास नकार दिला जात होता.
 
 
 
तेव्हा, आईने खूप विनवण्या करून मुख्याध्यापकांना भेटून शीतलसह चार भावंडांसाठी शाळेत प्रवेश मिळवला. शाळेत असल्यापासूनच शीतलला क्रीडा क्षेत्राची आवड होती. इयत्ता सहावीमध्ये शिकत असताना शाळेच्या शिक्षिकेने शीतलला ‘मार्शल आर्ट’ या क्रीडा प्रकाराची गोडी लावली. शाळेत फलकावर आपले नाव लागावे आणि नाव जाहीर होताच संपूर्ण शाळेने टाळ्या वाजवून स्वागत करावे, असे स्वप्न कायम मनी बाळगलेल्या शीतलने क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरवून दाखवले. इथूनच तिच्या क्रीडाविश्वाला खरी सुरुवात झाली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पदवीचे शिक्षणही सोलापूरच्याच वालचंद महाविद्यालयामधून पूर्ण केले.
 
 
 
मुलीने मोठ्ठे व्हावे, क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, यासाठी आई निर्मला खरटमल हिने अपार कष्ट उपसले. मुलीच्या भविष्यासाठी तिने रस्त्यावर भाजी विकली व शिलाई मशीन चालवली. त्यावेळी आई मला भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा, डॅशिंग पोलीस अधिकारी किरण बेदी, माजी पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी सांगत असे. याच ध्येयापायी तिने माझा बॉयकट करून एखाद्या मुलाप्रमाणे माझे संगोपन केले. त्यामुळे आजच्या या यशाची प्रेरणास्थान आईच असल्याचे शीतल आवर्जून सांगतात. लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात रमल्यामुळे संरक्षण खात्यात कारकिर्द घडवण्याचा निश्चय तिने केला. त्यानुसार २००३ सालापासून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू होती. अखेर, क्रीडा कोट्यामधून २००९ साली शीतल ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्या.
 
 
  
ठाणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक पदी असलेल्या शीतल गेली १२ वर्षे सचोटीने सेवा बजावत आहेत. या यशाबाबत शीतल सांगतात की, ‘’अत्यंत कठीण अशा या स्पर्धेतराष्ट्रीय स्तरावर माझे मार्गदर्शक असलेल्या ‘सीए’ तांबोळी सर, प्रशिक्षक मधुकर पगडे, अमोल साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, माझ्या कुटुंबाचाही यात मोठा वाटा असून आई निर्मला आणि वडील मल्लिकार्जुन यांचेही अमूल्य मार्गदर्शन नेहमीच लाभत आले आहे.” यापूर्वी शीतल यांनी ‘ज्युडो मार्शल गेम्स’मध्ये 11 वेळा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
 
 
 
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर शीतल यांनी ६५ सुवर्ण, ४३ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांची कमाई केली आहे. त्यांना आजवर टॉप १५ ‘वुमन आयकॉन पुरस्कार’ (बंगळुरू), ‘कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार’ (पुणे), ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ (मुंबई), ‘भारत भूषण पुरस्कार’ (भोपाळ) ‘खाशाबा जाधव क्रीडा खेलरत्न पुरस्कार’ अशा नाना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
 
खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शीतल यांना २०२० साली ‘अर्जुन पुरस्कार’ आणि मानद डॉक्टरेटदेखील प्रदान करण्यात आले आहे. युरोपातील बाकु अझरबैजान येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘बेल्ट व मास्क रेस्लिंग चॅम्पियनशिप’मध्ये उझबेकिस्तान, अझरबैजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशातील स्पर्धकांशी स्पर्धा करत शीतल यांनी आंतरराष्ट्रीय ‘बेल्ट रेस्लिंग’ प्रकारात कांस्य पदक व मास्क रेस्लिंग प्रकारात रौप्य पदक मिळवून ठाण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे.
 
 
 
याशिवाय येथे आयोजित करण्यात आलेल्या ’नॅशनल हाईलँड फेस्टिव्हल’ या अझरबैजान प्रजासत्ताक येथील युवा आणि क्रीडा मंत्रालय, जागतिक एथनोस्पोर्ट कॉन्फेडरेशन, अझरबैजान प्रजासत्ताकचे सांस्कृतिक मंत्रालय आदींनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सव स्पर्धेतील कल्चर प्रकारात शीतलने भारतीय संघाला रौप्यपदक प्राप्त करून दिले आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने भारतीय संस्कृतीची परंपरा जपून भारतीय पोशाख परिधान करीत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.
 
 
 
युरोपात झालेल्या या आंतरराष्ट्रीय ‘बेल्ट व मास्क रेस्लिंग चॅम्पियनशिप’मध्ये ४२ देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
अपयशाने खचून न जाता प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण प्रयन करीत राहण्याचा संदेश त्या युवावर्गाला देतात. तसेच, जास्तीत जास्त महिलांना ‘सेल्फ डिफेन्स’ शिकवण्याचा ध्यास असलेल्या शीतल यांनी आजवर हजारो महिलांना सक्षम बनवले आहे. ‘ज्युडो मार्शल आर्ट’च्या प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘स्वयंसिद्धा’ शिबिरात त्या मार्गदर्शन करीत असून त्यांना अधिकाधिक महिलांना ‘स्वयंसिद्ध’ बनवायचे आहे. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये पदक तसेच ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनण्याचा ध्यास लागलेल्या या खाकितील वीरश्री शीतल खरटमल यांना भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.