भारत भाग्य विधाता राष्ट्रगीतातील हे सहज सोपें तीन शब्द आहेत. खरंतर रवींद्रनाथ टागोर यांनी "भारतो भाग्यो बिधाता" या नावाने रचलेले हे मूळ बंगाली गीत आहे. राष्ट्रगीत हे म्हणायला खरंतर फक्त ५२ सेकंद लागतात पण पांच कडव्याचे हे गीत मुळातून कसे आहे हे जाणून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न करणार आहोत. आज या माध्यमातून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा बघितला आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक जागरूक झाली आहे. विद्यमान केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा या मोहिमे अंतर्गत अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्र प्रथम ही भावना या निमित्ताने मनामनात रुजली.
आजपासून ठीक ७५ वर्षांपूर्वी देश स्वातंत्र्य होत असताना १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पहिल्यांदा संविधान सभेची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला ‘जन-गण-मन’ गायलं गेलं होतं. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations) मध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाला भारताच्या राष्ट्रगीताबाबत माहिती मागितली गेली. तेव्हा भारतीय मंडळाने ‘जन-गण-मन’ची रेकॉर्डिंग संयुक्त राष्ट्र संघाला दिली.
त्यादिवशी संपूर्ण जगभरातून आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताचं राष्ट्रगीत अभिमानाने वाजवलं गेलं. त्यावेळी सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. या घटनेच्या तीन वर्षांनंतर २४ जानेवारी १९५० ला भारताच्या संविधानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. या दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अधिकृतरित्या ‘जन - गण - मन’ ला राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगान घोषित केलं.
जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||
अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||
घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके स्नेहमयी तुमी माता
जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल रवि च्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे तव चरणे नत माथा जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||५||
आपल्या राष्ट्रगीताचा मराठी अर्थ फार थोड्या लोकांना माहीत आहे. स्वत: रवींद्रनाथ टागोर आपल्या या गीताबद्दल म्हणाले होते, ‘प्रगती, अधोगतीमुळे ओबडधोबड बनलेल्या मार्गावरून युगानुयुगे प्रवास करणाऱ्या यात्रिकांचा जो चिरसारथी, जन गणाचा जो अंतर्यामी आणि मार्गदर्शक, अशा त्या भारत भाग्य विधात्याचाही या गीतात जयघोष केला आहे.’
राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ यानिमित्ताने पाहूया..
जन-गण-मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता ।
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग।
पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे दक्षिण भाग, उत्कल म्हणजे आताचा ओडिशा, बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
विंध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधितरंग।
विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नावचा गजर करतात.
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे;
गाहे तव जय गाथा।
जन-गण मंगलदायक जय है,
भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय है।।
तुझा जय जयकार. त्रिवार जयजयकार.
खरंतर राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राचे गीत. आपल्या मनात आपल्या राष्ट्राविषयी जे प्रेम वाटते, जो आदर वाटतो ते व्यक्त करणारे हे गीत. प्रत्येक देशाचे आपापले राष्ट्रगीत असते. राष्ट्रगीत म्हणजे आपल्या राष्ट्राचा मानबिंदू आहे. म्हणून ते म्हणताना ताठ व स्तब्ध उभे राहायचे असते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या गीताचे हिंदी रूपांतर केले व त्यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक हे गीत गात असत. पाच कडव्यांपैकी पपहिल्या कडव्याचे आता आपण आपल्या राष्ट्रमातेची थोरवी मुक्तकंठाने गातो.
कारण आपल्या सर्व भारतीयांची आई एकच आहे. ती म्हणजे भारतमाता. आपल्या स्वत:च्या आईबद्दल जी भावना मनात असते तीच भावना भारतमातेबद्दल आहे. म्हणून राष्ट्रगीताची भावना ही राष्ट्रप्रेमाची ज्योत अखंडपणे तेवणारी आहे. येणाऱ्या काळातही ही भावना सतत जागरूक राहील हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
8668541181