पवई तलावातील अवैध बांधकामावर पालिका अधिकाऱ्यांचे 'नो कॉमेंट्स'

    14-Aug-2022   
Total Views |
qq
 
 
 
 
 
मुंबई: पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थांबवण्यात आले, परंतु, तलाव परिसर पूर्ववत करण्याच्या आदेशांचे पालन पवई तलाव परिसरात अजिबात झालेले दिसत नाही. या बद्दल विचारले असता "गरजेनुसार पालिका पाऊले उचलेल, नो कॉमेंट्स'’ असे उत्तर देण्यात आले आहे. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक  यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र देऊन ही याचिका तात्काळ मागे घेण्यास सांगितले आहे. 
 
 
 
मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी पवई तलावातील सायकल ट्रॅकचे बांधकाम बेकायदेशीर ठरविले होते. तसेच 'सायकल ट्रॅक'चे काम थांबवून तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. परंतु पालिकेने काम थांबवून, केलेले काम जसेच्या तसे सोडून दिले होते. पालिकेने तलावाच्या परिघात सुमारे ५०मीटरहुन अधिक पर्यंतचा खडी दगडांचा भराव घातला होता. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता, तो आजतागायत तसाच आहे. वर पालिकेने या सुनावणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले."तलावात कोणतेही नवीन बांधकाम हाती घेण्यात आलेले नाही, पालिका योग्य ती कारवाई करेल, या विषयावर अधिक प्रतिक्रिया देणार नाही", असे सांगितले. तसेच इतर लोकउपयोगी विकास कामांविरोधात पर्यावरणाच्या नावाने बिगुल वाजवणारे मात्र पवई तलावातील बांधकामाबाबतीत मौन बाळगून आहेत.
 
 
 
“पवई तलावातील 'सायकल ट्रॅक' हा आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, परंतु अशा प्रकारे तलावात भराव टाकून तलावाचे क्षेत्रफळ कमी करणे चुकीचेच आहे. मुंबई उच्च न्यायलयाने तलाव परिसर पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जर मनमानी पद्धतीने कारभार करणार असतील, तर त्यांच्या विरोधात आम्ही सगळे एकवटू. विविध वन्य प्रजातींचे अधिवास नष्ट करून काय साध्य होणार आहे? तर काही लोकांचा इगो सुखावला जाणार आहे. महानरपालिकेने केलेल्या याचिकेविरोधात आम्ही सगळे एकत्र आहोत. आरेतील मेट्रो-३ कारशेड विरोधात बोलणारे लोक मात्र या संदर्भात चकार शब्द काढायला तयार नाहीत.  -मनोज कोटक, खासदार, ईशान्य मुंबई
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव.
रामनारायण रुईया स्वायत महाविद्यालयातून बी. एम. एम. पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.