मुंबई : झी मराठीवर सध्या सर्व नवे कार्यक्रम सुरु होत आहेत. त्यामध्ये गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. या कार्यक्रमात सर्व महिला कलाकार, राजकारणी आदि सहभागी होत आहेत आणि अन्य स्त्रिया त्यांना आपल्या मनातले प्रश्न विचारताना दिसतात. आणि या सर्वाचे सुत्रासंचालन करत आहे सुबोध भावे. आत्तापर्यंत या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या.
यंदाच्या भागात भाजप आमदार पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. याचा भन्नाट प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पंकजा यांना राजकीय आणि खासगी प्रश्न या स्त्रिया विचारत आहेत. आणि उत्तर देताना पंकजा यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुबोधने पंकजा मुंडे यांना प्रश्न केला आहे की, 'तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार कधी फोडलेत का?' यावर पंकजा ताईंनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. त्या म्हणतायत ,'हो.. मी आमदार फोडले आहेत.' त्यावर सुबोध म्हणतो, कोण आणि कधी ?.. त्यावर पंकजा म्हणतात, 'सगळंच सांगत बसले तर एक वेगळा भाग आपल्याला शूट करावा लागेल. पण अनेक लोकांनी आज आमच्याकडे म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या जिल्ह्यात कित्येक राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आमच्याकडे आले आहेत.' असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, 'आज ज्या पदावर मी काम करत आहे. तिथे या गोष्टी होतातच. राजकारणात आले तेव्हा माझ्या वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही. जर आपल्याकडे बेरीज होत असेल तर काही हरकत नाही. कारण राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला शोभेल असे लोक मी पक्षात घेत असते. आमच्याकडे अर्धेलोक बाहेरूनच आले आहेत. त्यामुळे हे सुरूच राहतं' असं मोठा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला.