सुसंवादिनी

    10-Aug-2022   
Total Views |

manasa
मंचावरील मान्यवर आणि श्रोते यातील दुवा असणाऱ्या नाशिक येथील निवेदिका पियू शिरवाडकर-आरोळे यांच्याविषयी...
 
 
 
कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यात निवेदनाचा मोठा वाटा असतो. सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांना, भाषणांना एका सूत्रात गुंफणे, ही जबाबदारी पार पाडत मंचावरील मान्यवर व श्रोत्यांमधील दुवा साधतो तो यशस्वी निवेदक. अशाच एक निवेदक म्हणजे `निवेदनकला.` या क्षेत्रात १६ वर्षांची कारकिर्द पूर्ण करणाऱ्या नाशिकच्या पियू शिरवाडकर-आरोळे... पियू यांचे बालपण जुन्या नाशिक परिसरात गेले. नाशिकमधील काळाराम मंदिरात, तांबट आळीतील विठ्ठल मंदिरात आपली आजी इंदिरा यांच्यासोबत जाणे, तिथल्या भजन-कीर्तनात रमून जाणे, भजनी ठेक्यावर भान हरपून नाचणे या त्यांच्या बालपणीच्या काही ठळक आठवणी. यातूनच पुढे सुरुवात झाली शास्त्रीय नृत्य शिकण्याची. गुरू रेखा नाडगौडा यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत राज्यात, देशात विविध कार्यक्रमांत त्यांनी सहभाग देखील घेतला. नृत्याच्या माध्यमातून त्यांना रंगमंच ओळखीचा झाला, सभाधीटपणा आला, रंगमंच सादरीकरणातील बारकाव्यांचे सादरकर्ते व प्रेक्षक या दोन्ही भूमिकांतून नकळत प्रशिक्षण घडत गेले.
 
 
 
शालेय जीवनात अभ्यासासह नृत्य, कथाकथन पियू करत होत्या. पुढे कलाशाखेत मराठी विषयात ‘एम.ए` करताना त्यांनी कलामंडळाची स्थापना केली. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभलेल्या या कलामंडळातील प्रत्येक कार्यक्रमाचे निवेदन पियू करू लागल्या. कार्यक्रम कसा असावा, त्याचे स्वरूप कसे असावे, हे आखताना आवश्यक तो अभ्यास त्या करत गेल्या आणि त्यातून निवेदन क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीची दिशा मिळाली. मुळातच आईने जाणीवपूर्वक लावलेली वाचनाची गोडी, जनस्थान गोदागौरवसारख्या कार्यक्रमांमधून मोठमोठ्या वक्त्यांचे ऐकलेले वक्तृत्व, घरात होणाऱ्या विविध चर्चांत सहभागी होण्यासाठी वाचन वाढवण्याची वाटलेली उर्मी, यातून त्यांच्यावर संस्कार होत गेले.
 
 
 
पत्रकारितेत व आकाशवाणीच्या वाणी कोर्समध्येही त्यांनी यश प्राप्त केले. विविध वृत्तपत्रांत सदरलेखन, रेडिओसाठी कॉपीरायटिंग व ‘ओबी जॉकी` म्हणून कार्य देखील केले. आकाशवाणीवरील ‘गोदातरंग` व इतर कार्यक्रमांसाठी संहितालेखन करताना विषयांमध्ये वैविध्य जपणे व परिपूर्ण लेखन करण्यावर त्यांचा कायमच भर होता. विविध कार्यक्रमांच्या निवेदनातून त्यांना लोकांशी संवाद साधण्याची व अभ्यासामुळे ज्ञानात होणाऱ्या वृद्धीची संधी त्यांना महत्त्वाची वाटते. निवेदनाची सुरुवात गायनाच्या कार्यक्रमांमधून झाली. सप्तशृंगगडावरील नावाजलेला गायन सोहळा, तसेच त्र्यंबकेश्वर संस्थानात झालेल्या भव्य सोहळ्याचे त्यांनी सहनिवेदन केले. पुढे त्या विचारपूर्वक साहित्यावर आधारित कार्यक्रमांकडे वळल्या.
 
 
 
‘ज्ञानपीठ` विजेते वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे पियू यांचे आजोबा. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात, मार्गदर्शनात आपण लहानाचे मोठे झालो, याचा त्यांना सार्थ अभिमान तर आहेच. शिवाय ‘शिरवाडकर` या आडनावासह येणाऱ्या जबाबदारीचे डोळस भानदेखील! साहित्य आणि दिग्गज साहित्यिकांच्या कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रंगणाऱ्या गप्पांमधून आपल्याला विलक्षण मौल्यवान असा ठेवा गवसत आहे, हे बालपणी त्यांना जाणवत नव्हते. आज मात्र निवेदन करताना तेव्हा ऐकलेले एखादे वाक्य, विचार माझ्या शब्दांत सहज डोकावून जातात तेव्हा आपण खरंच भाग्यवान आहोत, असे वाटून जाते, असे पियू सांगतात. एखाद्या अपयशाला सकारात्मकतेने सामोरे जाणे, व्यक्तिमत्व विकास करताना आपल्यात असलेल्या उपजत प्रतिभेला जपणे व ती वाढवत नेणे, साहित्याविषयी साहित्यिकांविषयी आपली जाणीव समृद्ध करत नेणे, हे पियू कुसुमाग्रजांशी वेळोवेळी होणाऱ्या चर्चांमधून शिकल्या.
 
 
 
लहानग्या पियूची निरनिराळ्या फुलांची असणारी आवड जपणारे, अंगणात असलेल्या लॉनवर चालणारे, एखाद्या कलाकृतीचा अन्वय समजवणारे तात्याआजोबा असे अनेक रूपातले कुसुमाग्रज सांगताना पियू आजही भावनिक होतात. याच साहित्यिक जिव्हाळ्यातून अरुणाताईंच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन केल्यानंतर त्यांनी दिलेली शाबासकी आपल्यासाठी अनमोल आहे, असे पियूंना वाटते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रत्येकच क्षेत्राला नवनवे आयाम प्राप्त होत आहेत. निवेदन कलाही त्याला अपवाद नाही. आज-काल आपल्या मातृभाषेतून कामाला संधी मिळत नाही, असे वाटत असतानाच या क्षेत्रात संधी निश्चितच आहेत. त्यासाठी मेहनतीची, जगभरातील विविध मान्यवरांनी केलेले निवेदन ऐकण्याची, आपली म्हणून एक शैली विकसित करण्याची आवश्यकता असते, असे पियू सांगतात. नव्यानेच उदयास आलेल्या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म` वरील माहितीपटांसाठी संहितालेखन करण्याची, त्यासाठी पुन्हा नव्याने अभ्यास करण्याची व या माहितीपटांना आपल्या आवाजात रेकॉर्ड करण्याची संधी मिळावी, असे त्यांना आवर्जून वाटते व त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.