सुसाट मेट्रो-३! भूमिगत बोगद्यांचे काम ९८.६ टक्के पूर्ण!
मुंबईकरांची गर्दीतून लवकरच सुटका; मेट्रो-३चे काम जलद गतीने सुरू
10-Aug-2022
Total Views | 98
20
मुंबई: भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग-३ साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन अखेर चाचण्यांसाठी सुसज्ज करण्यात आली आहे. बॅटरी-ऑपरेटेड रेल्वे-कम-रोड शंटरने ही पहिली 8-डब्याची प्रोटोटाइप ट्रेन यशस्वीरित्या सारीपुत नगर येथे तयार केली आहे. आता या ट्रेनची सारीपूत नगर ते मरोळ मरोशी अशी चाचणी येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो मार्ग-3 ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्णपणे भूमिगत आहे. या मार्गात २६ भुयारी मार्ग आणि एक ओव्हरग्राउंडसह २७ स्थानके आहेत आणि २०३१ पर्यंत दररोज १७ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स यांसारखी महत्त्वाची केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ मेट्रोने जोडली जातील. कुलाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चक्कं ५० मिनिटांत पोहोचणे सोपे होईल.
सध्या ९८.६ टक्के बोगदे पूर्ण झाले असून सुमारे ८२.६ टक्के भूमिगत स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर सरकारी आणि २.५६ हेक्टर खाजगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. परंतु मेट्रो-३चे कारशेड जलद गतीने होणे गरजेचे आहे. मेट्रो-३च्या कारशेडचे काम एमएमआरसीएल कडून लवकरात लवकर पूर्ण होऊन ही मेट्रो सुरू व्हाव्ही अशी लाखो सामान्य मुंबईकरांची इच्छा आहे.