चिनी हेरगिरी नौकांवर वचक

    10-Aug-2022   
Total Views |
 
china
 
 
भारत-चीनच्या ताणलेल्या संबंधांवर आपली राजकीय पोळी भाजून घेणारे राहुल गांधी आता गप्प आहेत. ज्यावेळी देशहिताचा प्रश्न असेल तेव्हा सत्ताधारी-विरोधक एकत्र असावेत, हे संपन्न आणि समृद्ध लोकशाहीचं द्योतक. परंतु, स्वतःच्याच पक्षाची मोट नीट बांधता न येणार्‍या गांधी कुटुंबीयांना इथवर पोहोचायला आणखी अवकाश आहे. त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोहोचू न शकणार्‍या चिनी हेरगिरी जहाजाबद्दल कुणी बोलणार नाही. सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या सरकारने चीनचे हेरगिरी करणारे जहाज आता त्यांच्या हंबनटोटा बंदरावर येणार नाही, अशी अधिकृत घोषणा केली.
 
श्रीलंकेची लंका लावण्यासाठी आणि दक्षिणेकडून भारतावर नजर ठेवता यावी, यासाठी चीनने ९९ वर्षांसाठी हंबनटोटा बंदर भाडेतत्वावर घेतले. भाडेतत्वावर दिलेल्या या जागेवर अर्थोअर्थी श्रीलंकेचे कसलेही नियंत्रण नाही. श्रीलंकेच्या नागरिकांनाही बंदरानजीक सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी फिरकण्याची परवानगीही नाही. चीनने भारताच्या हेरगिरीसाठी पाठवण्यासाठी तयार ठेवलेली सात लष्करी जहाजे भारताने डोळे वटारल्यावर श्रीलंकेत पोहोचू शकली नाहीत. श्रीलंकेवर बसवलेला वचक यावेळी कामी आला आणि केंद्र सरकारचे मुत्सद्दी धोरणही. चीनच्या नादी लागून भीकेला लागलेल्या देशांच्या रांगेत नेपाळ, पाकिस्ताननंतर आता श्रीलंकाही आहे. भारताने वेळोवेळी केलेल्या मदतीशी प्रामाणिक राहाण्याऐवजी चीनशी हातमिळवणीच करायची असेल, तर यापुढे भारतही तशीच आक्रमक भूमिका घ्यायला मागेपुढे पाहाणार नाही, याची कल्पना आता श्रीलंकेलाही आहे. चीनची हेरगिरी करणारी सात जहाजे हिंदी महासागरात न पोहोचणे हा याच रणनीतीचा भाग. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्रालय म्हणते की, हेरगिरी करणारे चिनी जहाज ’युआंग वांग पाच’ हंबनटोटा बंदरावर येणार म्हणून वाद झाला. यामुळे श्रीलंकन सरकारने चीनशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारी याबद्दल माहितीही दिली. ती अशी, ‘युआंग वांग पाच’ आता 11 ऑगस्टला हंबनटोटाला पोहोचणार नाही. हे जहाज इथे इंधन-भरणा करून दि. १७ ऑगस्ट रोजी परतणार होते. त्यामुळे आम्ही चिनी दूतावासालाही याबद्दल माहिती दिली. जहाज हंबनटोटाला येण्याचे नियोजन तूर्त टाळावे, असे आम्ही सांगितले आहे. इथेही श्रीलंकेने चीनशी सलगी करण्याची संधी सोडली नाही. ‘आमचे द्विराष्ट्रीय संबंध उत्तमच आहेत. जहाज थांबविले म्हणून आमची मैत्री थांबू शकत नाही,’ असेही श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्रालय म्हणते. त्याअर्थी चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’शीही श्रीलंका सहमत आहे. चीनकडे अशी सात जहाजे आहेत. प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरात ती हेरगिरी करतात. कुठेतरी दूरवर असलेल्या नियंत्रण कक्षाला ही जहाजे माहिती पाठवतात.
‘युवांग वाग पाच’ ही दुसर्‍या आवृत्तीतील हेरगिरी करणारी संपूर्णपणे चिनी बनावटीची युद्धनौका आहे.२५.२ मीटर रुंद आणि ५ हजार, २२२ मीटर उंच असलेल्या या जहाजांची भारताच्या सागरी सीमांवर टेहळणी करण्याची आठ वर्षांतली चौथी वेळ आहे. हेरगिरी करणार्‍या चीनच्या या सातही युद्धनौका फक्त संशोधनासाठी जाणार असल्याची सारवासारवही दोन्ही देशांनी केली. मात्र, संशोधनाच्या नावाखाली फक्त हेरगिरी हा उद्देश भारताने पूर्वीच ओळखून चीनला जरब बसवली. चीनकडून आलेल्या स्पष्टीकरणाचा मुद्दाही वेगळाच आहे. चीनने भारताचे थेट नाव घेतले नाही. श्रीलंका-चीन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संशोधनात्मक कामामुळे कुणाला जर का सुरक्षेची चिंता वाटत असेल, तर त्यासंदर्भात श्रीलंकेशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. भारतानेच सर्वांत आधी हा हेरगिरी करणार्‍या युद्धनौकेचा मुद्दा उपस्थित केला. ‘युआंग वांग पाच’ जहाज २००७ पासून कार्यरत आहे. ११ हजार टन वजनी क्षमता असणार्‍या या युद्धनौका हंबनटोटा पोर्टहून तसेच कोलंबोच्या अडीचशे किमी दूर आहेत. श्रीलंकेच्या समुद्रीसीमेच्या परिघात टेहळणी करणार्‍या या हेरगिरी युद्धनौकांवरील वचक भारताने यानिमित्ताने कायम ठेवला आहे. हंबनटोटा बंदर पुन्हा भविष्यात श्रीलंकेला मिळू शकेल याबद्दल शाश्वती बिलकूलही नाही. चीनची तिथली वळवळ संपण्याची चिन्हेही नाहीत. त्यामुळे सागरी सीमांवरील वचकच ती थांबवू शकतो.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. तीन वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन.