मुंबई : "मातोश्रीशी छेडछाड करू नका २० फूट खाली गाढले जाल. अमरावतीचे बंटी - बबली" अशा शब्दात अनेकदा राणा दाम्पत्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. मात्र "कोण रवी राणा? काय लायकी त्याची? आधी घर सांभाळा" अशी वक्तव्य करत सुनील राऊत देखील आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे.
काल रात्री उशिरा ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले. तब्बल १६ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. परंतु संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून त्यांचे बंधू सुनील राऊत हे मात्र आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु वेळोवेळी माध्यमांसमोर येत सुनील राऊत हे संजय राऊतांच्याच शैलीत प्रतिक्रया देत असल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
स्वपना पाटकर कॉल रेकोर्ड प्रकरण हे भाजप नेते किरीट सोमय्यांचा प्लॅन असून शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीची कारवाई झाली असल्याचेही सुनील राऊतांनी म्हटले आहे. तसेच बोगस कागदपत्र दाखवून संजय राऊतांना अडकवण्याचा प्रयत्न असला तरी संजय राऊतांच्या आवाज बंद होणार नाही. तेवढ्याच जोशात महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकांमध्ये संजय राऊत पैदा होईल आणि पुन्हा शिवसत्ता येईल, असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला आहे. परंतु ज्या प्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात मी भूकंप करणार आहे असे म्हणून घेतलेली पत्रकार परिषद फोल ठरली तसेच आमदार सुनील राऊतांसोबत तर होणार नाही ना?
जे संजय राऊत प्रत्येक घटनेवर टिप्पणी करण्यास सदैव तयार असतात आज त्यांच्याच बाजूने बोलण्यास खुद्द शिवसेना पक्षप्रमुखही पुढे येत नाहीत. परंतु वेळोवेळी माध्यमांना प्रतिक्रिया देणारे सुनील राऊत हेच संजय राऊतांनंतर शिवसेनेचा पुढचा आवाज होणार का? अशी शक्यता देखील यामुळे व्यक्त केली जात आहे.
पत्राचाळ प्रकरण हे पूर्णतः बोगस असून संजय राऊतांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सुनील राऊत यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ईडीला घरात सापडलेले १० लाख रुपये हे अयोध्या दौऱ्याच्यावेळी सर्वांनी योगदान म्हणून जमा केले होते. ते पक्षाचे असून पक्षाकडे सुपूर्द करण्याचे राहिले असल्याचेही सुनील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.