ओडिशात दुर्मिळ 'मेलेनिस्टिक' वाघ कॅमेऱ्यात कैद
सिमलीपाल नॅशनल पार्कमधले दुर्मिळ दृश्य
01-Aug-2022
Total Views | 164
मुंबई: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये काळ्या वाघाचे दर्शन झाले आहे. या दुर्मिळ काळ्या वाघाने झाडावर ओरखडे काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शेअर केलेल्या १५ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, दुर्मिळ 'मेलेनिस्टिक' वाघ एका झाडावर ओरखडे काढताना दिसून आला आहे.
हा 'मेलेनिस्टिक' वाघ त्याची हद्द चिन्हांकित करताना दिसून आला. या मेलेनिस्टिक वाघावर विशिष्ट गडद पट्टे असतात, आणि हे वाघ खूपच दुर्मिळ आहेत. या पूर्वीही काळे किंवा मेलेनिस्टिक वाघ फक्त ओडिशाच्या सिमलीपालमध्ये कॅमेरात कैद करण्यात आले आहेत. शुक्रवारी दि. २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दुर्मिळ मेलानिस्टिक वाघाची एक क्लिप आयएफएस सुशांत नंदा यांनी शेअर केली. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पातून एक अतिशय अद्वितीय जनुक पूल असलेल्या एका वेगळ्या लोकसंख्येचे वास्तव्य या निमित्ताने दिसून येते , असे ते या वेळी म्हणाले.