आजचा आपला लेख हा अशाच एका नादिष्ट, छंदिष्ट आणि एकलव्य बाण्याच्या एका स्वयंभू कलाकाराची ओळख करून देणारा आहे. अनेक वर्षे अनेक कलाकृती अनेक ठिकाणी देऊनसुद्धा कुठेही ज्येष्ठतेचा अभिनिवेश नाही, अतिगंड नाही, स्वतःला किशोरवयीन किंवा लहान समजत अनेकांना, ज्येष्ठांना थक्क करून सोडणारं कलाकाम करणार्या प्रयोगशील चित्रकार किशोर श्रीधर नादावडेकर यांचा कलाप्रवास अदभुत तर आहेच. परंतु, थक्क करणारादेखील आहे.
इच्छाशक्ती असेल, तर छंद जोपासता येतो. छंद हा ‘आवड’ असलेल्या गोष्टींचा लागतो. आवड ही अंगी बाणवावी लागते. आवडीतूनच अद्भुत काहीतरी घडते. मग काय ‘नाद करायचा नाय’ इतकं ठाम बोलता येतं. हे सर्व साध्य होण्यासाठी सिद्ध व्हावं लागतं. सिद्ध होण्यासाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवावी लागते. एकलव्याने गुरूच्या मूर्तीला समोर ठेवून तो ‘लक्ष्यवेधी’ बनला. श्रद्धा आणि निष्ठा या दोन स्थितींना जवळ करावे लागते त्यासाठी... आपण जे काम हाती घेणार आहोत, त्या कामाप्रति निष्ठा असावी लागते. निष्ठा जर वाढावी, असे वाटत असेल तर श्रद्धा असणं फार महत्त्वाचं असतं, हे सर्व जुळून आलं, जवळून साधता आलं, तर कथित अधिकृत शिक्षणाची आवश्यकता भासत नाही. विनोबा भावेंनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की, व्यवहारात जे उपयोगाला येतं तेच खरं शिक्षण. पुस्तकातून जे शिकायला मिळतं, त्याद्वारे माहिती जरूर मिळते. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा आपल्याला सहभागी व्हावं लागतं, त्यावेळी येणारा अनुभव हा आपल्यासाठी ज्ञानच असते. आजचा आपला लेख हा अशाच एका नादिष्ट, छंदिष्ट आणि एकलव्य बाण्याच्या एका स्वयंभू कलाकाराची ओळख करून देणारा आहे. अनेक वर्षे अनेक कलाकृती अनेक ठिकाणी देऊनसुद्धा कुठेही ज्येष्ठतेचा अभिनिवेश नाही, अतिगंड नाही, स्वतःला किशोरवयीन किंवा लहान समजत अनेकांना, ज्येष्ठांना थक्क करून सोडणारं कलाकाम करणार्या प्रयोगशील चित्रकार किशोर श्रीधर नादावडेकर यांचा कलाप्रवास अदभुत तर आहेच. परंतु, थक्क करणारादेखील आहे.
जाहिरात एजन्सीत काम केलं की, ते काम त्या जाहिरात संस्थेच्या नावावर जातं. त्यामुळे कलाकाराचे हात-पाय-कल्पनाशक्ती आणि करिअर हे जखडून टाकल्यासारखे बनते. म्हणून जाहिरात संस्थेतील काम सोडून किशोर नादावडेकर यांनी पेंटिंग चितारण्याकडे लक्ष केंद्रित केले. कारण, पेंटिंगवर कलाकार त्याचं नाव लिहू शकतो. याच विचारांतून त्यांनी १९९५ मध्ये जाहिरात संस्थेतील काम करण्याचा कंटाळा आल्यामुळे नोकरी सोडली आणि कुंचला हाती धरला. निष्ठेने, श्रद्धेने आणि अदम्य इच्छाशक्तीने निर्णय घेतला, तर जीवन जगण्याच्या वाटा आपोआप मिळतात. आवड असलेली चित्रकला उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकते, हे जर उदाहरणासह सिद्ध करा, असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर आहे, चित्रकार किशोर नादावडेकर. हातात कला आणि बैठकीची सवय असणारे त्यांच्या त्यावेळच्या कला विद्यार्थ्यांचे वर्गकाम, ज्याला ‘स्वाध्यायिका’ म्हणतात, त्या करवून द्यायचे. त्यामुळे ‘आर्ट स्कूल’मध्ये काय शिकवतात, या प्रश्नाचं उत्तर त्यांना आपोआप मिळायचं. अशा कलाप्रवासात त्यांचे भाषाकोविद गोवेकर चित्रकार विजय आचरेकर, चित्रकार वासुदेव कामत अशा ज्येष्ठ दृश्यकलाकारांची भेट झाली. ओळखीत रूपांतरित झाली ती भेट आणि ‘संस्कार भारती’ चित्रकला ग्रुपशी किशोर नादावडेकर जोडले गेले. ’चित्रविषय’ त्यांना शोधत असायचे, तर ते चित्रविषयातील ’चित्र’ शोधत असायचे, त्यातूनच २००१ ला ‘नेहरु सेंटर’ येथे पहिल्यांदाच त्यांचे चित्र प्रदर्शित झाले. २००५ मध्ये कलाकारांच्या पंढरीमध्ये ‘जहांगिर आर्ट गॅलरी’त त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरले, त्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि चित्रकार किशोर नादावडेकर यांच्या कलाकृतींनी कलारसिकांना अक्षरश: नादावले. जवळपास ९० टक्के कलाकृतींची विक्री झाली. कलाक्षेत्रामध्ये प्रयोगशील चित्रकाराच्या कलाकार्याची ‘एन्ट्री’ झाली.
त्यांच्या कलाकृतींची विशेषत: व्यक्ती चित्रकारांची खास दखल घेतलेल्या महान व्यक्तिमत्त्वांपैकी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदे या सर्वांनी त्यांच्या कलाकार्याचे कौतुक केले आहे. भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयात लावण्यासाठी चित्रकार किशोर नादावडेकर यांच्या कलाकृतीची निवड केली आहे. कलेचं अधिकृत कलाशिक्षण घेण्यापासून परिस्थितीमुळे वंचित राहिलेल्या, मात्र कलेची भरभरून साधना-उपासना करणार्या किशोर नादावडेकर यांनी कधीही ‘परिस्थिती’ची सहानुभूती मिळविली नाही. कलाशिक्षणच अशा प्रामाणिक-संवेदनशील जन्मत:च कलावंत असणार्या कलाकारापासून वंचित राहिलं, असं मला वाटतं. खरं म्हणजे ‘कलेचं अधिकृत कलाशिक्षण’ याची व्याप्ती आता फूटपट्टीने मोजण्याच्या पलीकडे गेलेली आहे. संवेदनशील मनाच्या नादावडेकर यांनी गेली अनेक वर्षे कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी पेंटिंग्ज दिलेली आहेत. सिग्नलवर भीक मागणारी मुलं किंवा दिव्यांग मुलांसाठी, त्यांनी त्यांच्या सोबत बसून अनेक कलाशिबिरे घेतलेली आहेत. युद्धात घायाळ झालेल्या, दुखापत झालेल्या, अपंगत्व आलेल्या देशाच्या आर्मी-नेव्ही आणि ‘एअरफोर्स’मधील सैनिकांची काळजी घेणारी संस्था पुण्यात आहे. खडकी येथील ‘पॅराप्लेजिक रिहेब (रिहॅबिलिटेशन) सेंटर’ (झरीरश्रिशसळल ठशहरलळश्रळींरींळेप उशपींशी) येथे नादावडेकरांच्या पेंटिंग्जचे प्रात्यक्षिक आणि प्रकट मुलाखत आयोजित केली होती. त्यावेळी तेथे उत्साहाने हात-पाय गमावलेल्या काही सैनिकांनी तोंडात ब्रश घेऊन चित्रे रंगविली. कुणी पायाने चित्रे रंगविली. त्यांच्या चेहर्यावर दु:खाची पुसटशी किनारही किशोर यांना दिसली नाही, असं ते सांगतात. असे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे अनुभव किशोर नादावडेकर यांच्या गाठीशी आहेत.
कलेला सामाजिक बांधिलकीत रंगविलं, तर ती अधिक ‘आयुष्यमान’ ठरते. किशोर यांच्या कलाकृती या अनेक संग्राहकांकडे आहेत. ’गडकरी रंगायतन-ठाणे’, ‘ओल्ड कस्टम हाऊस’, ‘शिवसेना भवन’, ‘स्पोर्ट्स म्युझियम-दिल्ली’, ‘ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम-दिल्ली’, ‘ठाणे मनपा’, आणि देश-विदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृती ‘संग्राह्य कलाकृतीं’च्या सन्मानात प्रदर्शित आहेत. त्यांना अनेक राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. ‘जेजे’त शिकण्याचं त्यांचं स्वप्न आता त्यांचा मुलगा अद्वैत, कलाशिक्षण घेऊन पूर्ण करत आहे. स्वप्न पाहणं-स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं आणि परिस्थितीलाही वळण लावणार्या त्यांच्या वळणा-वळणाच्या कलाप्रवासाला भविष्यासाठी शुभेच्छा...!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ