नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अन्नपूर्णा देवी यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
“संकुचित विचारसरणीतून शिक्षणाला बाहेर काढून २१व्या शतकातील आधुनिक विचारांशी शिक्षणाला जोडणे हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मूळ आधार आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. “देशात बुद्धिमत्तेची आणि प्रतिभेची कधीच कमतरता नव्हती. मात्र, ब्रिटिशांनी निर्माण केलेली शिक्षणपद्धती कधीही भारतीय मूल्यांचा भाग नव्हती,” असे पंतप्रधानांनी सांगितले. “त्यांनी भारतीय शिक्षणातील बहुआयामी मूल्य अधोरेखित केली आणि आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीसंदर्भात दृष्टिकोन विचारला. आपण केवळ पदवीधारक युवा वर्ग तयार करू नये, तर देशाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची गरज असलेली आपली शिक्षण व्यवस्था देशाला दिली पाहिजे. आपल्या शिक्षकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी या संकल्पाचे नेतृत्व करावे,” यावर पंतप्रधानांनी भर दिला. “नव्या भारताच्या निर्मितीसाठी, नवीन प्रणाली आणि आधुनिक प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत, ”यावरही पंतप्रधानांनी भर दिला. “यापूर्वी ज्याची कल्पनाही केली जात नव्हती, ते आता प्रत्यक्षात आले आहे,” असे ते म्हणाले. “कोरोनाच्या मोठ्या महामारीतून आपण केवळ इतक्या वेगाने सावरलो नाही, तर आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक झाली आहे. आज आपण जगातील तिसर्या क्रमांकाची स्टार्टअप व्यवस्था आहोत,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
वाराणसीतील १८०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधानांनी ५९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. वाराणसी ‘स्मार्ट सिटी’ आणि शहरी प्रकल्प याअंतर्गत असणार्या विविध विकासकामांमध्ये ‘नमो घाट फेज १’चा पुनर्विकास याशिवाय स्नानासाठी असणार्या ‘जेटी’ची उभारणी, डिझेल आणि पेट्रोल इंजिन असणार्या ५०० बोटींचे ‘सीएनजी’मध्ये रुपांतरण, जुन्या काशीतील कामेश्वर महादेव भागाचा पुनर्विकास आणि हर्हुआ आणि दासेपूर गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या ६०० जागांची उभारणी, लहरतारा-चौका घाट उड्डाणपुलाखालील भाग विकसित करणे, पर्यटकांसाठीच्या सुविधा तसेच दशाश्वमेध घाटावरील बाजारपेठ, ‘आयपीडीएस फेज’ तीन अंतर्गत नग्वा येथे ३३/११ घत उपकेंद्र या कामांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी यावेळी विविध रस्ते प्रकल्पांचेही उद्घाटन केले. यामध्ये बाबतपूर-कापशेथी-भदोही मार्गावरील उड्डाणपुलाचे चौपदरी मार्गाचे बांधकाम, सेंट्रल जेल मार्गावर वरुणा नदीवरील पूल, पिंडरा-कथिरा मार्ग, फुलपूर सिंधोरा लिंक मार्गाचे रुंदीकरण, ग्रामीण भागांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण आणि रस्ते बांधणी, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सात रस्त्यांची बांधणी आणि धारसौना-सिंधुरा मार्गाचे रुंदीकरण या प्रकल्पांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा सुधारण्याशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यामध्ये वाराणसी शहरातील जुन्या सांडपाणी वाहिनीची ‘ट्रेंचलेस’ तंत्रज्ञानाद्वारे पुनर्स्थापना, ‘ट्रान्स वरुणा’ भागात 25 हजारांहून अधिक घरांना सांडपाणी नलिका जोडणी, शहरातील सिस वरुणा परिसरात गळती दुरुस्तीची कामे, तातेपूर गावात ग्रामीण पेयजल योजना यांचा समावेश यामध्ये आहे. महगाव येथील ‘आयटीआय’, ‘बनारस हिंदू विद्यापीठातील वैदिक विज्ञान केंद्राचा टप्पा-२ रामनगर येथे मुलींसाठी शासकीय निवास, दुर्गाकुंड येथील शासकीय महिला वृद्धाश्रमात ‘थीम पार्क’ अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले.
बडा लालपूर येथे डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा संकुलात ‘सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक’ आणि ‘सिंथेटिक बास्केटबॉल कोर्ट’ आणि सिंधौरा येथे पोलीस ठाण्याची अनिवासी इमारत, मिर्झामुराद, चोलापूर, जनसा आणि कपसेठी येथे पोलीस ठाण्यात बराक आणि खोल्यांचे बांधकाम, पिंडरा येथे अग्निशामक केंद्राची इमारत आणि विविध पोलीस आणि अग्निसुरक्षा प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले.
या प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी जागतिक बँकेचे साहाय्य असलेल्या उत्तर प्रदेशातील गरिबांसाठी पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत असलेले सारनाथ बौद्ध सर्किट, अष्टविनायकसाठी पावनपथ, द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा, अष्टभैरव, नवगौरी यात्रा, पंचकोसी परिक्रमा यात्रा मार्गावरील पाच थांब्यांची पर्यटन विकासकामे तसेच जुन्या काशीमधील विविध वॉर्डांमध्ये पर्यटन विकासकामे यांच्यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. सिगरा येथील क्रीडा स्टेडियमच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.
१२०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली. यामध्ये लहरतारा-बनारस हिंदू विद्यापीठ ते विजया सिनेमा या रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणासह पांडेयपूर उड्डाणपूल ते रिंगरोड रस्त्याचे चौपदरीकरण, कचहरी ते संदाहा रस्त्याचे चौपदरीकरण, वाराणसी भदोही ग्रामीण रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, वाराणसी ग्रामीण भागात पाच नवीन रस्त्यांची बांधणी आणि चार सीसी रस्त्यांचे बांधकाम, बाबतपूर रेल्वे स्थानकाजवळ बाबतपूर-चौबेपूर रस्त्यावर ‘आरओबी’चे बांधकाम, अशा विविध रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे शहर आणि ग्रामीण रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होईल.