नवी दिल्ली: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवार दि. ०८ रोजी संध्याकाळी निधन झाले. आबे यांच्यावर नारा शहरात शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी गोळीबार करण्यात आला होता. आबे हे पश्चिम जपानमध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर मागून हल्ला करण्यात आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांचे निधन झाले आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी दि. ८ रोजी एका प्रचार कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी नारा शहरात होते. रविवारी झालेल्या वरच्या सभागृहाच्या निवडणुकीच्या आधी झालेल्या कार्यक्रमात भाषण करत असताना गोळीबाराचा आवाज आला. गोळी लागल्यावर आबे यांची शुद्ध हरपली आणि जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. आबे यांना उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
माजी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्या राखाडी शर्ट घातलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आरोपींनी अबे यांच्यावर बंदुकीने गोळी झाडली. ही बंदूक जपानी पोलिसांनी जप्त केली आहे. हा हल्ला सकाळी ११:३० वाजता झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान भाषण करत असताना आरोपी मागून आला, आणि दोन गोळ्या मारल्या. दुसऱ्या गोळीनंतर, लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यांना 'कार्डियाक मसाज' दिला.
आबे यांना गोळ्या घालणारा आरोपी ४० वर्षीय आहे, असे जपानी पोलिसांनी दिलेल्या अहवालात नमूद आहे. माजी जपानी पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. शिंजो आबे यांच्या पंतप्रधान कालावधीत भारत-जपान आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ झाले. तसेच भारतात बुलेट ट्रेन येण्यासाठी शिंजो आबे यांनी मोलाचे योगदान दिले होते.