सांगली : महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांचे वेळापत्रक होऊन परीक्षा पार पडत आहेत. मात्र शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या २८० महाविद्यालयातील जवळपास तब्बल ३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले आहे. परीक्षा जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमवस्था आहे. दि. ५ मे रोजी परीक्षा जाहीर होणे अपेक्षित होतं, मात्र अद्यापही विद्यापीठाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी दि. ४ जुलैला कुलगुरूंना निवेदन दिले असता, “आम्ही संभाव्य वेळापत्रक जाहीर करत आहोत.” असं उत्तर विद्यापीठाकडुन मिळाले असुन प्रत्यक्षात विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यासंबधी परिपत्रक आलेले नाही. कुलगुरू विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असुन नियोजन शून्य कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इतर विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. काहींना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचे असते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकरीला लागायचे असते अशा विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करायचं असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. अनेक स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षांना बसता येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याच काम याठिकाणी विद्यापीठाकडून होत आहे. तसेच विद्यार्थ्याचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे.
सुरुवातीला कुलगुरूंनी परीक्षा पारंपारिक पद्धतीने होतील अशा सूचना दिल्या होत्या. परंतु काही राजकीय पक्षांनी व संघटनांनी विद्यापीठांमध्ये आंदोलन केल्यामुळे परीक्षा MCQ स्वरुपामध्ये ऑफलाईन पद्धतीने होतील असे कुलगुरूंनी जाहीर केले. पण अद्याप ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याच पद्धतीचे निर्देश त्यांनी दिले नसल्यामुळे अजून कितीतरी दिवस परीक्षा होणार आहेत की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. या सर्व घटनेमुळे परीक्षेत दिरंगाई होत आहे. त्यामुळे “काही राजकीय नेत्यांचे कुलगुरू वरती दबाव आहे की काय? त्यामुळेच बहुदा कुलगुरू निर्णय घेण्यास सक्षम दिसत नाहीये?” असा प्रश्न अनिल ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वारंवार कुलगुरूंना भेटुन, निवेदन देऊन, परीक्षा तात्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. परंतु त्यांनी अजून परीक्षा जाहीर केलेल्या नाहीत. पुढील दोन दिवसात कुलगुरूंनी परीक्षा जाहीर केल्या नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू शिर्के सर यांच्या दालनामध्ये घुसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री, अनिल ठोंबरे यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सांगली जिल्हा संयोजक ऋषिकेश पोतदार, सांगली महानगर सहमंत्री दर्शन मुंदडा हे उपस्थित होते.