समाजभान जागृत असणारी विद्यार्थिनी

    06-Jul-2022   
Total Views | 80

mansa
 
विद्यार्थीदशेतच समाजभान जपत केवळ समस्या न मांडता त्यावर उपाययोजनेनुसार कार्य करणार्‍या ग्रीष्मा नागमोती हिच्या कार्याविषयी...
 
 
समाजातील समस्या जाणून त्यावर उपाययोजना करणारे नागरिक हेच खर्‍या अर्थाने जागरुक नागरिक. नाशिक येथील ग्रीष्मा पंकज नागमोती ही इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी अशाच सामाजिक समस्या जाणून त्यावर उपाययोजना साधण्याचे कार्य करत आहे. तसेच ती शास्त्रीय संगीताचे धडेदेखील गिरवत आहे. इयत्ता आठवीत असताना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या दिवशी शाळाबाह्य मुलांचा ग्रीष्माने शोध घेतला. साक्षरतेच्या माध्यमातून मिळवणार्‍या ज्ञानाने समृद्ध होऊन विकासाच्या दिशेने जाणारा समाज आपण बघत असलो तरी आपल्या आजूबाजूला अनेक वंचित घटक पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. अशा निरक्षर, वंचित, अनाथ व गरजू मुलांना अक्षरज्ञान व्हावे, या उद्देशाने ग्रीष्माने शिक्षण दिनाबाबत मुलांशी संवाद साधला. तसेच त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना प्राथमिक शिक्षण, दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक व्यवहारज्ञानही या मुलांना देण्याचा प्रयत्न केला.
 
 
निरक्षर, परिस्थिती अभावी शिक्षण न घेऊ शकलेल्या, तसेच शिक्षणाची आवड असणार्‍या मुलांना आपणही काही शिकवावे, या हेतूने ग्रीष्माने हा उपक्रम हाती घेतला आणि तिला मुलांना शिकवण्याची गोडी लागली. तेव्हापासून आजपर्यंत अशा मुलांना शिकवण्यासाठी ग्रीष्मा प्रयत्नरत आहे.
 
 
बालदिनाच्या औचित्यावर ग्रीष्माने बालसुधारगृहातील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी विविध खेळ खेळत आणि संवाद साधत अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा केला. बालगृहातील विद्यार्थ्यांसाठी सहकार्यात्मक अध्ययनावर आधारित खेळ घेतले. त्यांच्याकडून झालेल्या गुन्ह्यांच्या विश्लेषण करून त्यांना सुधारण्यासाठी काही उपाययोजना यावेळी तिने सुचविल्या. त्यांना ‘महापुरुषांच्या जीवनचरित्रातील संदेश, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा,’ असा संदेश दिला. ’पाण्याचे व्यवस्थापन’ या विषयासंदर्भात नाशिक शहरातील दहा हॉटेल्समध्ये पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाते, याचा अभ्यासदेखील ग्रीष्माने केला.
 
 
सद्यःस्थितीत ग्रीष्मा इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रात सातत्याने लेखन करते. लेखनाची आवड असल्याने वेगवेगळ्या विषयांवर व वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांवर लेखन करण्याचे कार्य ग्रीष्मा करत आहे.
 
 
इयत्ता पाचवी-सहावीत असल्यापासून ग्रीष्माला असे वाटायचे की, आपण काहीतरी वेगळे करावे. घरातील वातावरण आणि वडिलांपासून प्रेरणा घेऊन विविध उपक्रम राबविण्याचे तिने ठरविले. पुस्तकी ज्ञान सोडून अजून अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण विचार करू शकतो, असे मत ग्रीष्मा व्यक्त करते. वय कमी किंवा जास्त असे काही नसते. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत. यांनी बालवयात एवढे महान कार्य केले, तर आपणही थोडेफार काम करावे, याच धारणेतून ग्रीष्माचे कार्य सुरू आहे. वैचारिक परिपक्वता यायला हवी. समाजात घडत असणार्‍या घटना समजायला हव्यात, त्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे ती आवर्जून सांगते.
 
 
अगदी तिच्यापेक्षा वयाने व अनुभवाने मोठ्या व्यक्तीदेखील तिची प्रशंसा करतात. हे बघून कामाचा उत्साह वाढत असल्याचे ती आवर्जून सांगते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूनेच ग्रीष्माचे सर्व कार्य सुरू आहे. तिच्या कामाबद्दल कळल्यानंतर समाजातील मान्यवर तिच्या कामाची आवर्जून दखल घेतात.
 
 
भविष्यात तरुणांसाठी एखादा उपक्रम हाती घेण्याचा विचार ग्रीष्माच्या मनात आहे. जसे की, काही ऐतिहासिक, सांस्कृतिक, नेतृत्व, कौशल्य आणि मूल्य आधारित गोष्टींची त्यांच्यामध्ये रुजवणूक होऊ शकते. या गोष्टींसाठी कदाचित शिक्षण या माध्यमाची तिला मदत होऊ शकेल, असा आशावाद ती व्यक्त करते. अजून इतर व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करून त्यांच्यावर लेखन करण्याची इच्छा ती आवर्जून प्रकट करते. समाजाने ज्ञानी व्हावे. कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ती स्वीकारू नये. स्वत:चेयोग्य मत तयार करावे. न्याय आणि समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजानेच प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ग्रीष्मा व्यक्त करते.
 
 
समाजामध्ये अशा असंख्य गोष्टी व शाखा आहेत, जेथे फार कमी लोकांची नजर पडते. त्या शाखांमध्ये समाजातील घटकांनी काम करावे, अशी ग्रीष्माला वाटते.
 
 
समवयस्करांनी आपला इतिहास आणि संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. आपण कितीही आधुनिक विचारांकडे गेलो तरी संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली असली पाहिजे, अशी मनीषा ग्रीष्मा बोलून दाखविते.
 
 
तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना परिपक्व समाजभान जपत केवळ समस्या न मांडता त्यावर उपाय शोधण्याचे कार्य ग्रीष्मा आजपर्यंत करत आहे.
 
 
समाजशील कार्य करणार्‍या ग्रीष्माचे कार्य हे नवोदितपणे कार्य करणार्‍या अनेकांसाठी नक्कीच पथदर्शक असे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121