रूग्णालयातील वैद्यकीय कचर्‍याची पदपथावरच विल्हेवाट

कॉटन ग्रीनवासीयांच्या आरोग्याशी मुंबई महापालिकेचा खेळ

    04-Jul-2022
Total Views | 55
groundzero cottongreen
 
 
 
 
 
मुंबई (शेफाली ढवण) : कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथावरच वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘ग्राऊंड झिरो’ मोहिमेदरम्यान निदर्शनास आला आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवत या ठिकाणी काही गोडाऊन माफियांकडून पदपथासहरस्त्यावरच वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावली जात आहेत. प्राप्त माहितीनुसार, हा वैद्यकीय कचरा परळमधील ‘केईएम’ रुग्णालयातून या गोडाऊनमध्ये येत आहे. त्यामुळे पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा सुरू असलेला हा प्रकार नेमका कधी थांबेल, असा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारत आहे.
 
‘हार्बर लाईन’च्या कॉटन ग्रीन स्थानकाबाहेर पश्चिमेला लागून असणार्‍या पदपथावर पत्र्याचे गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये हॅण्डग्लोव्ह्ज, पीपीई किट, सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, औषध सीरिंज, बॅण्डेज असा वैद्यकीय कचरा साठवून ठेवलेला आहे. या रस्त्यावरून महिला, पुरुष, शाळकरी विद्यार्थ्यांसह दररोज हजारो नागरिकांची ये-जा सुरु असते. सतत वर्दळ असलेल्या या परिसरात हा वैद्यकीय कचरा अशाप्रकारे उघड्यावर असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
 
वैद्यकीय कचर्‍याने भरलेल्या या गोडाऊनमधील कचरा रस्त्यावरही पडलेला असतो. हा कचरा वेचणार्‍या कर्मचार्‍यांच्या हातात ग्लोव्ह्ज, मास्कही नसतात. त्यामुळे गोडाऊन मालकांकडून या कर्मचार्‍यांच्या आरोग्याकडेही साफ दुर्लक्ष केले जात आहे. या धक्कादायक प्रकाराविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनी, या कचर्‍यासंबंधी आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून कचरा वेचणार्‍यांकडे नसलेल्या मास्क आणि ग्लोव्ह्जविषयी आमच्याकडे तक्रार आली नव्हती. परंतु, आता आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंदवून घेतो, असे सांगितले. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ कार्यालयात यासंबंधी अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.मात्र, हे नागरिक अजूनही दोषींवर कारवाईची प्रतीक्षा करत आहे.
 
 
या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल
कॉटन ग्रीन स्थानकाबाहेरच वैद्यकीय कचरा वेगळा करण्यात येत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आलेली असून हा कचरा ‘केईएम’ रुग्णालयाचा असल्याची माहिती आहे. तसेच यासंबंधित ‘केईएम’च्या मुख्य अधिष्ठातांनी ‘सेग्रीगेशन सेंटर’मध्ये पत्र दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच यासंबंधी आम्ही पत्र पाठविले आहे. कचरावेचक कर्मचार्‍यांकडे ग्लोव्ह्ज किंवा मास्क नसल्याचे आम्हाला आपल्याकडून कळले. यासंबंधीची तक्रार नोंदवून घेत आहोत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- स्वप्नजा क्षीरसागर, साहाय्यक आयुक्त, (एफ-दक्षिण विभाग)
 
 
केंद्र सरकारचे वैद्यकीय कचर्‍याबाबतीतचे नियम
वैद्यकीय संस्थांसाठी वैद्यकीय कचरा किंवा जैव वैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये आधुनिक मशीन आणि उपकरणे बसविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कचर्‍याच्या निवारणासाठी योग्य त्या व्यवस्थेचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणेही अनिवार्य आहे. अन्यथा, त्या वैद्यकीय संस्थेची नोंदणी रद्द करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच भारत सरकारने जैव वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम १९९८ मध्ये पारित केलेला असून तो जैववैद्यकीय कचरा गोळा करणार्‍या, वाहतूक करणार्‍या, विल्हेवाट लावणार्‍या, व्यवहार करणार्‍या अशा सर्व व्यक्तींसाठी लागू आहे. त्याचसोबत हा नियम सर्व रुग्णालये, दवाखाने, नर्सिंग-होम, रक्तपेढ्या, पॅथॉलॉजी संस्था, आणि प्राणी संस्था अशा सर्व वैद्यकीय संस्थांनाही लागू आहे.
 
 
नियम सर्रास पायदळी
दररोज प्रत्येक रुग्णालय, प्रत्येक खाट आणि दवाखान्यामागे अंदाजे एक ते दोन किलो वैद्यकीय कचरा जमा होतो. म्हणजेच, २०० ते ३०० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयामागे २०० ते ३०० किलो वैद्यकीय कचरा निघतो. तसेच, वैद्यकीय कचर्‍यामध्ये अंदाजे पाच ते दहा टक्के कचरा संसर्गजन्य ठरण्यासह घातक ठरू शकतो. त्यामुळे ज्या रुग्णालयांमध्ये दररोज अंदाजे पाच ते दहा किलो वैद्यकीय कचरा आढळतो, त्याची रुग्णालयाच्या परिसरातच विल्हेवाट लावणे, अनिवार्य आहे. या वैद्यकीय कचर्‍याची उघड्यावर विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध आहे. परंतु, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाबाहेर मात्र, या नियमांना सर्रास पायदळी तुडवले जात आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121