अमरावती : अमरावतीत औषध व्यापारी उमेश कोल्हेची सूर भोसकून हत्या करण्यात आली. नुपूर शर्माचे समर्थन केल्याने हत्या करण्यात आली, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या घटनेचा संबंध उदयपूरच्या घटनेशी लावला जात असल्याची माहिती आहे. यासंबंधी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, असे सांगितले आहे.
उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी या प्रकरणात चोरीची केस दाखल करून ४ आरोपीना ताब्यात घेऊन हे प्रकरण शांत करत असल्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.
अमरावती पालकमंत्र्यांच्या दबावाखाली येऊन आरती सिंह यांच्याकडून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय़ अथवा एनआयए कडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.