मुंबई(प्रतिनिधी): नवी मुंबईमध्ये या वर्षी दि. १९ एप्रिल रोजी टॅग केलेला लेसर फ्लेमिंगो 'हुमायून' गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी भरतीच्या ठिकाणी जाऊन सहा फ्लेमिंगोना रेडिओ टॅग केले. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला आहे.
बीएनएचएसने 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्रकल्पाचा भाग म्हणून ठाणे खाडीतील 'लेसर' आणि 'ग्रेटर' फ्लेमिंगोचे स्थलांतर आणि अधिवास समजून घेण्यासाठी 'उपग्रह टेलिमेट्री अभ्यास' सुरू केला. याद्वारे शास्त्रज्ञांनी या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत भरतीच्या ठिकाणी सहा फ्लेमिंगो पकडले. त्यानंतर फ्लेमिंगोंवर सौर उर्जेवर चालणारे 'जीपीएस-जीएसएम' रेडिओ टॅग लावण्यात आले होते. या सहा फ्लेमिंगोना 'खेंगरजी' , 'लेस्टर' 'मॅककॅन' 'सलीम' 'हुमायून' 'नवी मुंबई' अशी नवे देण्यात आली होती.
सध्या, 'हुमायून' पक्षी भावनगरच्या नवा बंदर रोड जवळील पाणथळ क्षेत्रात आहे. बीएनएचएसचे दिग्गज आणि प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ हुमायून अदुलाली, यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव देण्यात आले होत. फ्लेमिंगोंचे खाद्य, प्रजनन आणि स्टॉपओव्हर साइट्सचे संरक्षण करण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. या अभ्यासानंतर त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती सुचवण्यात येणार आहेत.
फ्लेमिंगो विषयी
जगात फ्लेमिंगोच्या सहा प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यापैकी दोन - 'लेसर फ्लेमिंगो' ' फोनिकोनायस मायनर' आणि 'ग्रेटर फ्लेमिंगो' 'फोनिकॉप्टरस रोझस' - भारतात आढळतात. जगात २२ ते ३२ लाख लेसर फ्लेमिंगो असल्याचा अंदाज आहे. तर ग्रेटर फ्लेमिंगोंची संख्या पाच ते आठ लाख आहे. 'आययुसीएन' द्वारा करण्यात आलेला वर्गीकरणानुसार लेसर फ्लेमिंगो धिक्याच्या धोक्याच्या स्थितीत नाहीत. तर, ग्रेटर फ्लेमिंगोना तूर्तास धोका नाही. लेसर फ्लेमिंगोच्या वितरणाचा विस्तार मोठा आहे. आणि ते उत्तर-पश्चिम भारत आणि भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर आढळतात, तर, ग्रेटर फ्लेमिंगो पूर्व आणि ईशान्य भारत वगळता संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.
स्थलांतराचा इतिहास
सप्टेंबर ते मे या कालावधीत सुमारे १.३ लाख फ्लेमिंगो ठाणे खाडीला भेट देतात. ठाणे खाडी परिसर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि स्थलांतर हे विसाव्या शतकापासून एक रहस्य आहे. कच्छच्या रणात 'ग्रेटर फ्लेमिंगो'चे प्रजनन १९९० मध्ये महाराव श्री 'खेंगरजी तिसरे' यांनी पहिले होते. त्यांनी 'कॅप्टन सी.डी. लेस्टर' यांना कळवले. कच्छच्या रणातही लेसर फ्लेमिंगोचे प्रजनन होते या कथेला १९७४ मध्ये पुष्टी डॉ. सलीम अली यांनी दिली. तेव्हापासून, कच्छमध्ये देखील फ्लेमिंगोच्या प्रजननावर अभ्यास सुरू आहे.
.