कलासृष्टीचा मुसाफिर...

    29-Jul-2022
Total Views | 55


vikrant
 
 

एका लहानशा गावातून आयएएस होण्यासाठी आलेला मुलगा जिद्दीने आपला मार्ग बदलतो आणि नव्या क्षेत्रात झेप घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवतो, अशा विक्रांत रामदासविषयी...
 
 
 
आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल, तर थोडे आडमार्ग स्वीकारुन ‘आयडियाची कल्पना’ लढवावीच लागते. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण चांगले शिक्षण घ्यावे, नोकरी करावी. त्यात अगदीच वेगळे म्हणून त्यातल्या त्यात आवडीची अशी एखादी कला जोपासावी आणि ती दिनचर्या चालू ठेवावी. परंतु, विक्रांत रामदाससारखे क्वचितच काही तरुण असतात, जे या तथाकथित दिनचर्येला भेद देऊन वेगळं काही करण्याचे धाडस दाखवतात.
 
 
 
 
प्रत्यक्ष चित्रपटगृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट अथवा नाटक कधीच न पाहिलेला, मूळ अकोल्यात राहणारा विक्रांत स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आला खरा. परंतु, एकंदर पुण्याचे वातावरण बघून त्याच्या मनाला वेध लागले ते कला, संस्कृतीने नटलेल्या पुणे शहराचे आणि स्पर्धापरीक्षेचा विषय बाजूला ठेवून त्याने स्वतःला या कलाक्षेत्रात झोकून द्यायचे ठरवले. खरेतर त्याच्या कुटुंबात सर्वच उच्चशिक्षित. वडील शिक्षक, सख्खा भाऊ ‘इंजिनिअर’, चुलतभाऊ ‘आयएएस.’ त्यामुळे विक्रांतनेदेखील अशाच कोणत्या क्षेत्रात यावे आणि नाव कमवावे, अशी घरच्यांची इच्छा होती. परंतु, त्याच्यामधला कलाकार आता त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे जे काही करेन, त्यात यशस्वी होऊन दाखवेन, असा विश्वास त्याने आपल्या कुटुंबीयांना दिला आणि तिथून विक्रांत झाला या कलासृष्टीचा मुसाफिर.
 
 
 
vikrant
 
 
 
 
पुढे महाविद्यालयात मास मीडियाचे शिक्षण घेता घेता नाटक, चित्रपटांचा विक्रांतने झपाट्याने अभ्यास केला. त्याची लेखणी लिहिती झाली. स्वतः अभिनय करू लागला, दिग्दर्शन करू लागला. असे सर्व शिकत तो एकेक अनुभव गोळा करत गेला. पण, विक्रांतला त्याही पुढे जाऊन स्वतःचे असे वेगळे प्रयोग करायचे होते. जी काही चूकभूल होईल ती आपल्याच प्रोजेक्टमध्ये व्हावी म्हणजे अन्यत्र काम करताना त्याची पुनरावृत्ती होणार नाही, हीदेखील सुप्त धाकधूक नवोदित म्हणून त्याच्या मनात होती. परंतु, यातूनच तयार झाल्या त्या दोन अप्रतिम शॉर्टफिल्म्स 'द ड्रेनेज’ आणि ’इंदिरा.’
 
 
 
 
विक्रांतची पहिली ‘शॉर्टफिल्म’ म्हणजे ’द ड्रेनेज.’ पाठीशी कुणी गॉडफादर नसताना त्याने ही १५मिनिटांची ‘शॉर्टफिल्म’ तयार केली. काही साधायचे असेल, तर त्याचा मार्ग कधी सोपा नसतो, हे पुन्हा एकदा विक्रांतच्या निमित्ताने सिद्ध झाले. मुळात हे क्षेत्र बर्यानपैकी खर्चिक. त्यामुळे याचे निर्माते कोण होणार, हा प्रश्न सोडवताना एक-दोन वर्ष पुढे सरकली खरी, पण त्याने कच खाल्ली नाही आणि त्याच्या संयमाचे फळ त्याला मिळाले. नवाजुद्दिन सिद्दिकीने घेतलेल्या एका ‘शॉर्टफिल्म’च्या कथानक-संकल्पनेच्या स्पर्धेत तब्बल १५०० स्पर्धकांमधून फक्त पाच संहितांचीच निवड करण्यात आली होती. त्यातील एक कथा ही विक्रांतची होती. स्वतः नवाजुद्दिन सिद्दिकी व मुकेश छाब्रा यांनी त्याच्या ‘शॉर्टफिल्म’ची निर्मिती केली आणि त्याच्या ’द ड्रेनेज’ला भारतातूनच नाही, तर भारताबाहेरील ‘फेस्टिव्हल्स’मधूनही तुडुंब प्रतिसाद मिळाला.
 
 
 
 
vikrant
 
 
 
’द ड्रेनेज’नंतर आणखी वेगळा प्रयोग विक्रांतने केला आणि तो यशस्वी झाला, ती ‘शॉर्टफिल्म’ म्हणजे ’इंदिरा’ . मुळात ’इंदिरा’ सुचणे हाच एक प्रयोग आहे. प्रयोग का? तर कोणताही चित्रपट-नाटक म्हटले की, त्यात लेखक येतो, मग दिग्दर्शक, कलाकार, मोठी टीम, निर्माते इत्यादी सर्व ओघानेच येतात; पण आश्चर्य म्हणजे ’इंदिरा’ला कुणी लेखकच नाही, ना कोणती मोठी टीम आणि याही पुढे जाऊन बघितले, तर विक्रांतने ही फिल्म आयफोनवर शूट केली. आजपर्यंत मोबाईलवर शूट होणारी ही काही पहिली फिल्म नाही. परंतु, आपल्याकडे अशाप्रकारे शूट करावे इतका विश्वास या माध्यमावर आजही ठेवला जात नाही. परंतु, विक्रांतने या विचारांना छेद देत हे करून दाखवले. ‘कोविड’च्या काळात ज्यावेळी सर्व बंद होते, त्याकाळात फक्त दोघांमध्ये तयार झालेली ही ‘शॉर्टफिल्म.’ विक्रांतकडे आजही फिल्मची संहिता नाही, संवाद नाहीत. पण, ’इंदिरा’ आहे.
 
 
 
 
मनात इच्छा आणि जिद्द असेल, तर आपण कठीणात कठीण गोष्ट साध्य करू शकतो. प्रवाहाच्या दिशेने पोहत जाणे एकवेळ सोपे असेल. परंतु, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायची इच्छा असेल, तर तेवढी जिद्द आणि धैर्य असणे महत्त्वाचे आहे. एका लहानशा गावातून ‘आयएएस’ होण्यासाठी आलेला मुलगा जिद्दीने आपला मार्ग बदलतो आणि संपूर्णतः नव्या क्षेत्रात झेप घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवतो. हे धैर्य निश्चितच उद्याच्या सर्वच मुलांना प्रेरणा देणारे आहे. विक्रांतचे या यशस्वी प्रकल्पानंतर आता आगामी चित्रपटदेखील येऊ घातले आहेत. त्यामुळे ’द ड्रेनेज’ आणि ’इंदिरा’सारख्या चौकटीबाहेरच्या संकल्पना, मांडणी करणार्या् विक्रांत रामदाससारख्या नवोदित कलाकाराच्या हातात जर कलाभूमी असेल, तर नक्कीच तिचे भविष्य हे उज्ज्वल असेल, हे निर्विवाद!
 
 
                                                                                                                                           - वेदश्री दवणे  
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121