जीवाश्म इंधनाचा शोध लागला आणि मानवी इतिहासात विकासाला नवी दिशा मिळाली. गेल्या कित्येक दशकांपासून जीवाश्म इंधन जगाच्या ऊर्जेची मागणी पूर्ण करत आहे. परंतु, ऊर्जेची पूर्तता करत असतानाच जीवाश्म इंधनामुळे अनेक आव्हानेदेखील संपूर्ण मानवजातीसमोर उभी ठाकली आहेत. आज अवघे जग जीवाश्म इंधनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना दिसते, त्यात प्रदूषण, तापमान वाढ आदी आव्हानांचा समावेश होतो. त्यावरूनच जीवाश्म इंधन पर्यावरणासाठीही धोकादायक असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
मात्र, असे असले तरी जगभरात ऊर्जेची मागणी सातत्याने वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर जग ऊर्जेच्या उत्तमोत्तम पर्यायांच्या शोधात आहे. तसे पाहिले, तर आजघडीला ऊर्जेचे कितीतरी पर्यायी स्रोत आपल्या पुढ्यात आहेत. जगाची ऊर्जा गरज पूर्ण करतानाच हे पर्यायी स्रोत पर्यावरणासाठीदेखील अनुकूल असल्याचे मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे आगामी काही वर्षांत जवळपास सर्वच देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे. परंतु, सर्वांनीच नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा पुरेपूर वापर केला तरी ऊर्जेची गरज पूर्ण केली जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त नवीकरणीय ऊर्जास्रोतांशी निगडित इतरही अनेक समस्या आहेत. याच कारणामुळे अणुऊर्जाआपल्या भविष्याची सर्वांत मोठी गरज होत चालली आहे.
नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर करणे शक्य आहेच, ते स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही अनुकूल आहेत. पण, नवीकरणीय ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून ऊर्जा उत्पादनाची क्षमता मर्यादित आहे. याव्यतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा उत्पादनासाठी अधिकाधिक जागा आणि साहित्याचीही गरज असते. याचमुळे अणुऊर्जेला प्रोत्साहन दिले जात असून यातून कोळसा, नैसर्गिक वायू व खनिजतेलावरील अवलंबित्व नष्ट होईल. अणुऊर्जेकडे भविष्यकालिन ऊर्जा म्हणून पाहिले जात असून, यातून अमर्यादित ऊर्जा निर्मिती होऊ शकते. तसेच साधनसंपत्तीही कमी खर्च होते. महत्त्वाचे म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अणुऊर्जेचा उपयोग करणे अत्यावश्यक होत चालले आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर जगाला पुन्हा एकदा अणुऊर्जेच्या वापराचा विचार करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर फेब्रुवारीत एकदा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, अणु पुनर्जागरणाची वेळ येऊन ठेपली आहे, असे विधान केले होते. उल्लेखनीय म्हणजे फ्रान्सच्या अध्यक्षांनी पाच वर्षांपूर्वी आपले अणु आधारित वीज उत्पादन एक तृतीयांश पर्यंत घटवण्याची घोषणा केली होती. परंतु, आता ऊर्जेची वाढती मागणी पाहता फ्रान्स पुन्हा एकदा अणुऊर्जेकडे वळण्याची तयारी करत आहे. सध्याच्या घडीला फ्रान्सच्या ऊर्जा उत्पादनात ७० टक्के वाटा केवळ अणुऊर्जा केंद्रांचा आहे. त्या अर्थाने फ्रान्स अणुऊर्जेबाबत जगात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु, फुकुशिमामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर फ्रान्ससह जगभरातील कित्येक देशांनी अणुऊर्जेचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आता वाढते ऊर्जासंकट पाहता अणुऊर्जेबाबत जगाचा दृष्टिकोन बदलत आहे.
अणुऊर्जेच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन देणारे अनेक देश असून त्यात चीन सर्वांत पुढे आहे. २०१६ ते २०२०दरम्यान चीनने अणुऊर्जा उत्पादन दुपटीने वाढवले. चीनने अणुऊर्जेद्वारे या काळात ४७ गिगावॅट वीज तयार केली व २०३५ पर्यंत १८० गिगावॅट वीज ऊत्पादनाचे लक्ष्य ठेवले. ‘इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी-आयएईए’च्या अहवालानुसार, सध्या जगातील ३५ देशांत ४४३ अणु संयंत्र आहेत. याद्वारे जगाच्या गरजेपैकी दहा टक्के ऊर्जा उत्पादन होते. आकडेवारीनुसार अमेरिकेकडे सर्वाधिक ९३, फ्रान्सकडे ५६, चीनकडे ५१ आणि रशियाकडे ३८ अणु संयंत्र आहेत, तर भारत २३ अणु संयंत्रांसह सातव्या क्रमांकावर आहे.
‘आयएईए’च्या अहवालानुसार भारत, चीन, रशियासह एकूण २० देशांत सध्या ५४ अणुऊर्जासंयंत्रांची उभारणी करण्यात येत आहे. युरोपीय संघाच्या १३ देशांत १०७ अणु संयंत्र आहेत. याद्वारे युरोपच्या २६ टक्के विजेची निर्मिती होते. चीनमध्ये ५०अणु संयंत्र कार्यरत असून आणखी १३ अणु संयंत्रांची उभारणी केली जात आहे. अशाचप्रकारे भारतातही अनेक अणु संयंत्रांची निर्मिती सुरू आहे. भारत आगामी तीन वर्षांत एकाचवेळी दहा अणु संयंत्रांची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. या घडामोडी पाहता, जग अणुऊर्जेच्यावापराकडे अधिकाधिक वळत असल्याचे स्पष्ट होते.