ठाणे: विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या ज्येष्ठ भगिनी शैलजा बेडेकर या ‘मनोरंजन वाचनालय’ चार दशके यशस्वीपणे चालवणार्या म्हणून ठाणेकरांना परिचित आहेत. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नुकतेच ठाण्याच्या हाजुरी येथील ‘प्राच्यविद्या अभ्यास संस्थे’मध्ये ज्येष्ठ अभ्यासक व दंतशल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ शेजवलकर यांचे ‘वाचनातील आगळेवेगळे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी, व्यासपीठावर डॉ. विजय बेडेकर व डॉ. महेश बेडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. विजय बेडेकर यांनी शैलजा बेडेकर यांचे ‘वाचनप्रेम’ विषद करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. व्याख्यान देताना डॉ. रघुनाथ शेजवलकर यांनी त्यांचा वाचन प्रवास रंजकपणे उलगडला. व्हॉट्सअॅप, फेसबुक इ. समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. आपण सर्वचजण वाचक असतो. अगदी ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रक आदी वाहनांच्या मागे लिहिलेल्या काही ओळीदेखील आपण वाचत असतो. त्यातील वेगळ्या धाटणीच्या ओळी आपल्या लक्षात राहतात. एकट्याने बसून कोणालाही त्रास न देता वाढवता येणारा छंद म्हणजे वाचन होय, असे ते म्हणाले.
‘चांदोबा’ मासिकातील रंगीत चित्रांच्या सहवासात आमच्या पिढीचे बालपण गेले. बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा, चंद्रकांत काकोडकर यांच्या ‘शृंगारिक गुलाबी’ कथा इत्यादींचा उल्लेखही त्यांनी केला.
अनेक नवीन व वेगळ्या गोष्टी वाचनानेच समजतात. मात्र, आपली दृष्टी डोळस असली पाहिजे. तेव्हा, वाचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचा समारोप करताना ग्रंथपाल नारायण बारसे यांनी शेजवलकरांनी मांडलेल्या विचारांनुसार वाचनसंस्कृतीकडे वळण्याची गरज अधोरेखित केली. सुमेधा बेडेकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
वाचनप्रेमींना आवाहन
‘मनोरंजन वाचनालया’च्या निमित्ताने शैलजा बेडेकर यांनी ठाणेकरांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले, असे डॉ. शेजवलकर म्हणाले.शैलजा बेडेकर यांची सर्व पुस्तके हाजुरी येथील ‘प्राच्यविद्या अभ्यासक संस्थे’त ठेवली असून ठाणेकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. विजय बेडेकर यांनी केले.