महाराष्ट्रात दुर्मीळ माळढोक पक्षाचे दर्शन

नानज माळढोक पक्षी अभयारण्यात आढळली मादी

    24-Jul-2022
Total Views | 132
GIB
 
 
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्रातून नामशेष झाल्याची शंका असलेला माळढोक पक्षी पुन्हा एकदा राज्यात परतला आहे. सोलापूरमधील नानज माळढोक अभयारण्यात गेल्या आठवड्यात माळढोक मादीचे दर्शन घडले आहे. या पूर्वी मार्च २०२०मध्ये अभयारण्याला लागून असलेल्या मार्डी गावातील भगवान कदम यांच्या खासगी शेतात २ मार्च २०२० रोजी या मादीचा वावर आढळून आला होता.
 
 
महाराष्ट्रात माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी १९७९ साली सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील गवताळ अधिवास मिळून नानज अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला हे अभयारण्य ८,४०० चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर पसरले होते. या अभयारण्यात सर्वांत मोठा भाग नानज या गावातला आहे. दशकभरापूर्वी प्रजननाच्या दृष्टीने अनुकूल असलेली या परिसरातील माळढोक पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच घसरली. नष्ट होणारा अधिवास आणि मानवी हस्तक्षेपामुळे नानज अभयारण्यात हे पक्षी दिसेनासे झाले. सोलापूरबरोबरच विदर्भातही वरोरा आणि उमरेड तालुक्यात मोळढोकचा अधिवास होता. मात्र, या ठिकाणीही गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये माळढोकची नोंद झालेली नाही. २०११ सालापर्यंत महाराष्ट्रात माळढोक पक्ष्यांची संख्या अंदाजे २५ ते ३० इतकी होती. 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) २०१३ पासून देशभरात माळढोक संवर्धनासाठी एक कार्यक्रम सुरू केला.
 
 
 
 
 
 
या कार्यक्रमाअंतर्गत २०१७ मधील सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील माळढोक अधिवास क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, या सर्वेक्षणादरम्यान ’डब्लूआयआय’च्या संशोधकांना एकही माळढोक पक्षी आढळून आला नाही. त्यामुळे राज्यातून हा पक्षी नामशेष झाला असून त्याचे पुनरुज्जीवन होणे कठीण असल्याचे दिसत होते. परंतु, आता नानज अभयारण्यात माळढोक मादीचे दर्शन घडल्याने आशेची पालवी फुटली आहे. असे असले तरी, माळढोकचे पुनरुज्जीवन होण्यासाठी किंवा त्यांची संख्या वाढविण्यासाठी केवळ एकच मादी पक्षी उपयोगाची नाही, हे देखील तितकेच खरे!
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121