
नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना बुधवारी दि. २० जुलै रोजी सकाळी पोटदुखीच्या तक्रारीनंतर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मान यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली आणि निदानानंतर डॉक्टरांनी सांगितले की पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना संसर्ग झाला आहे. भगवंत मान यांनी मंगळवारी दि. १९ रोजी रात्री त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. तिथून त्यांना तातडीने दिल्लीला नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर मान यांना गुरुवारी सकाळी घरी सोडण्यात आले.
यापूर्वी, १७ जुलै रोजी, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सुलतानपूरलोधीला भेट दिली होती जिथे त्यांनी थेट काली बेन नदीचे प्रदूषित सांडपाणी प्यायले होते. २२व्या बेन कर सेवा स्वच्छता कार्यक्रमात, मान यांना नाल्यातील पाण्याचा ग्लास देण्यात आला आणि ते पाणी मानवी वापरासाठी पुरेसे स्वच्छ आहे हे दाखविण्याच्या प्रयत्नात त्यांनी ते थेट प्यायले. त्यानंतर उपायुक्त अशोक कौरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बेन काठावरील अनेक शहरे व गावांतील सांडपाणी त्यात वाहून जाते. मुख्यमंत्र्यांना हे पाणी न प्राशन करण्याचा सल्ला देण्यासाठी आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो, असेही ते म्हणाले. दोन दिवसांनंतर, मंगळवारी रात्री, मान यांना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने आणि डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे आढळल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.