व्याज वाचविणारे गृहकर्ज!

    22-Jul-2022   
Total Views |

home loan
 
 
‘इंटरेस्ट सेव्हर’ खाती हा नोकरदारांसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण, नोकरदार दर महिन्याला आपला पूर्ण पगार खर्च करत नाहीत. त्यातील काही रक्कम वाचवितात, अशांनी जर गृहकर्ज घेतले, तर हा पर्याय स्वीकारावा, म्हणजे व्याज कमी भरावे लागेल. कारण, गृहकर्ज ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्यात ठेवली, तर गृहकर्जावर भरावयाच्या व्याजाचे बरेच पैसे वाचतील. या खात्यात जमा केलेले पैसे गरज पडली, तर परत काढण्याचीही सोय आहे. त्याविषयी सविस्तर....
 
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने गेल्या दोन पतधोरणांत ‘रेपो दरा’त 90 ‘बेसिस पॉईंट्स’शी वाढ केल्यामुळे गृहकर्जदाराचा मासिक हप्ता वाढला. त्यामुळे नवीन गृहकर्ज घेणार्‍यांकडे एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे, ‘होम लोन इंटरेस्ट सेव्हर अकाऊंट’ किंवा ‘स्मार्ट लोन’चा पर्याय स्वीकारणे. या कर्जासाठी, कर्ज देणार्‍या यंत्रणांची वेगवेगळी नावे आहेत. ‘आयसीआयसीआय बँके’चे नाव आहे- ‘मनी सेव्हरहोम लोन.’ स्टेट बँकेचे नाव आहे - ‘मॅक्सगेन होम लोन’,‘ स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँके’च्या उत्पादनाचे नाव आहे ‘होम सेव्हर.’ हा पर्याय सर्व गृहकर्ज घेणार्‍यांना योग्य ठरत नाही.
 
 
दुहेरी फायदा
यात तुमचे गृहकर्ज खाते चालू खात्याशी संलग्न केले जाते. या खात्यात तुम्ही कितीही रक्कम भरू शकता. जर रक्कम भरण्यास आली तर व्याज कमी भरावे लागते. बँक गृह खात्यातील शिल्लक व खात्यात भरलेली अतिरिक्तची रक्कम यांचा रोज आढावा घेते व त्यानुसार गृहकर्जावर व्याज आकारणी केली जाते. असे गृहित धरूया की, तुमच्या गृहकर्ज खात्यात ५० लाख रुपये रक्कम शिल्लक आहे आणि तुमचे ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्यात २० लाख रुपये आहेत, तर गृहकर्जदाराला ३० लाख रुपये गृहकर्ज शिलकीवर व्याज आकारले जाणार. बँका साधारणपणे कर्जाचा जो मासिक हप्ता ठरविलेला असतो, त्यात बदल करत नाहीत, तर कर्जाचा कालावधी कमी करतात.
 
 
जर गृहकर्जदाराला मासिक हप्ता बदल करावयाचा असेल, तर तसे बँकेत सांगून करुन द्यावा लागतो. ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी काही रक्कम किंवा सर्व रक्कम तुम्ही कधीही काढू शकता. गृहकर्जदाराने जर या खात्यातली रक्कम काढली, तर त्याला जास्त दराने व्याज भरावे लागेल. या अशाप्रकारच्या कर्जावर व्याजाचा दर जास्त असतो. नेहमीच्या गृहकर्जाच्या व्याजदराने या खात्यात ०.५-०.६ टक्के व्याज जास्त आकारले जाते. जर तुमच्याकडे वरचेवर या खात्यात भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत असतील, तरच हे खाते उघडावे, नाहीतर हे खाते उघडून विनाकारण जास्त व्याज भरावे लागेल. नोकरदारांसाठी हा पर्यांय चांगला आहे. कारण, नोकरदार दर महिन्याला आपला पूर्ण पगार खर्च करत नाहीत. त्यातील काही रक्कम वाचवितात, अशांनी जर गृहकर्ज घेतले, तर हा पर्याय स्वीकारावा म्हणजे व्याज कमी भरावे लागेल.
 
 
जर पगारदाराने त्याची रक्कम बचत खात्यात ठेवली, तर त्यात अडीच ते तीन टक्के दराने व्याज मिळणार. जमा करून मुदतठेव खात्यात ठेवली, तर साडेपाच ते सहा टक्के दराने व्याज मिळणार, पण जर गृहकर्ज ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्यात ठेवली, तर गृहकर्जावर भरावयाच्या व्याजाचे बरेच पैसे वाचणार, या खात्यात जमा केलेले पैसे गरज पडली, तर परत काढण्याची ही सोय आहे. या खात्यात कर्जाच्या मुदतपूर्तीत ठरविलेल्या वेळेपूर्वी जास्त पैशांचा भरणा केला तसेच मुदतपूर्तीपूर्वी कर्जफेड केली, तर यासाठी शुल्क आकारले जाते. उदाहरणच द्यायचे तर ‘स्टॅण्डर्ड चार्टड’ बँक ही वैयक्तिक कर्जे घेणार्‍यांना त्यांनी जर ‘फ्लोटिंग’ दराने कर्जे घेतली असतील, तर काही शुल्क आकारत नाही, पण जर ‘होम सेव्हर लोन’ घेतले असेल, तर शुल्क आकारले जाते.
 
 
गृहकर्ज ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्याला पर्याय म्हणजे नेहमीचे गृहकर्ज. यासाठी व्याजाचा दरही कमी असतो आणि वेळेआधीही कर्जाचा भरणा करता येऊ शकतो व व्याज वाचविता येऊ शकते. गृहकर्जदाराला, गृहकर्जातून अधिकचे पैसे भरून लवकर बाहेर पडावयाचे असेल, तर ‘सेव्हर’ खात्याचा विचार करू नये. ही कर्ज योजना सर्व बँकांकडे नाही.
 
 
देशात अर्थचक्राला चालना मिळावी म्हणून रिझर्व्ह बँक गेली कित्येक वर्षे ‘रेपो दर’ ‘रिव्हर्स रेपो दरा’त वाढ करत नव्हती. उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जे मिळावीत व उद्योगचक्र चालू राहून देश आर्थिक मंदीतून बाहेर यावा, हे रिझर्व्ह बँकेचे धोरण होते. त्यामुळे त्या काळात देशात कर्ज ही कमी व्याजदराने दिली जात होती. परिणामी, ठेवींवरही कमी दराने व्याज दिले जात होते.
 
 
पण, देशात चलनवाढीचे प्रमाण प्रचंड वाढले व ते नियंत्रणात येणे कठीण झाले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने चलनवाढीला आळा बसावा म्हणून गेल्या दोन पतधोरणांत रेपो दर वाढविले. परिणामी, बँकांनी सर्व तर्‍हेच्या कर्जांवरील व ठेवीवरील व्याजदर वाढविले. नजीकच्या भविष्यात रिझर्व्ह बँक ‘रेपो दर’ सहा टक्क्यांपर्यंत वाढवेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी, गृहकर्जावरील व अन्य व्याजदरही वाढणार.
 
 
ज्यांच्याकडे सतत पैसा निधी येत असतो, अशांसाठी ‘इंटरेस्ट सेव्हर’ हा चांगला पर्याय आहे. या खात्याचे एक उदाहरण घेऊया- गृहकर्जदराने नऊ कोटी रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी ७.५० टक्के दराने घेतले आहे. हा गृहकर्जदार त्याच्या ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्यात १५ लाख रुपये शिल्लक ठेवतो, असे मानूया. जर ‘इंटरेस्ट सेव्हर’ खात्यात काही रक्कम असेल, तर अशा गृहकर्जादाराला महिन्यात मुख्य रक्कम व्याज मिळून रु. ६० हजार, ५६० रुपये बँकेत भरावे लागतील आणि जर वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या ‘सेव्हर इंटरेस्ट’ खात्यात १५ लाख जमा असतील, तर त्याला महिन्यात संपूर्ण २० वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्जदाराचे रुपये २९ लाख, ६३ हजार, ८३२ रुपये व्याजाकरिता वाचतील व फक्त ५.९८ टक्के दराने गृहकर्ज भरावे लागेल.
 
 
गृहकर्जाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक कर्जदारास त्याला जो योग्य वाटतो, तो पर्याय स्वीकारावा.
गृहकर्ज, वाहन कर्ज व शैक्षणिक कर्ज ही बँकांच्या किरकोळ कर्जे या ‘कॅट्गेरी’त समाविष्ट होतात व बँका किरकोळ कर्जे देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे गरजूंना सहज गृहकर्ज मिळू शकते व त्यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय प्रत्येकाने विचारपूर्वक घ्यावा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.