आधुनिक युगाची सुरुवात झाल्यापासूनच अमेरिकेसह युरोपीय देशांनी आपली भरघोस प्रगती करवून घेतली, तर भारतासह अनेक आशियाई देश विकसनशील ठरले. मात्र, या काळात आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देशांपर्यंत आधुनिकीकरण पोहोचलेच नाही, त्यांच्या प्रगतीचा वारु उधळलाच नाही.
आजही आफ्रिका खंडातील देशांचा समावेश अविकसित श्रेणीतच केला जातो. मात्र, सध्याच्या घडीला आफ्रिकन देश अप्रगत असले तरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पीकाऊ जमीन आणि सौरऊर्जासंपन्न क्षेत्राचा योग्य तो उपयोग केला, तर आफ्रिका खंडातील देश आगामी शतकाचे नायक ठरू शकतात. तथापि, या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुनियोजित वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचा आफ्रिकन देशांकडे अभाव आहे. पण, अशा परिस्थितीत भारताने त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला आहे. भारताच्या सहकार्याने आफ्रिका आपल्या साधनसंपत्तीचा आपल्या क्षमतेनुसार उपयोग करण्यासाठी सक्षम होईल आणि आर्थिकदृष्ट्या विकसितदेखील होईल.
उल्लेखनीय म्हणजे, भारत आणि आफ्रिका दीर्घ काळापासून एकमेकांशी व्यापार करत आले आहेत. त्यामुळे आफ्रिका खंडातील देश आणि भारतामधील आर्थिक संबंधांमध्ये वृद्धी झाली. पण, भारत आता या संबंधांना एक नवी दिशा आणि गती देण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी भारताने आता आफ्रिकेच्या विकासासाठी अनेकानेक योजनांची तयारी केली आहे. भारत नुसत्या योजना आणूनच थांबलेला नाही, तर आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवूणकही करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी सतराव्या ‘सीआयआय-एक्झिम बँक’ संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारत आणि आफ्रिका खंडातील देश एकत्र येऊन काम करून शकणार्या व भविष्यातील प्रचंड अर्थव्यवस्था होऊ शकणार्या विविध क्षेत्रांवर चर्चा केली.
पीयूष गोयल म्हणाले की, “माहिती-तंत्रज्ञान, सौरऊर्जा, पायाभूत सुविधा, लष्करी सहकार्य, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप इकोसिस्टीम अशी महत्त्वाची क्षेत्रे आहेत, जिथे भारत आफ्रिकन देशांचा एक मौल्यवान भागीदार होऊ शकतो. सध्या भारताने आफ्रिकेतील २७ अविकसित देशांना शुल्कमुक्त आयातीसाठी प्राधान्यक्रम दिला आहे. यामुळे आफ्रिकेला मोठा व्यापार लाभ होतो. याव्यतिरिक्त आफ्रिकेत ‘आफ्रिकन कॉन्टीनेन्टल फ्री ट्रेड एरिया’नामक योजना असून त्याचा उद्देश आफ्रिकन देशांतील आयातशुल्क कमी करत व्यापारी सुविधा वाढवण्याचा आहे. भारतही या योजनेचा भाग झाल्यास यातून भारतीय कंपन्या आणि गुंतवणुकदारांना एका मोठ्या, एकीकृत आणि मजबूत आफ्रिकी बाजारपेठेत वर्चस्वाची संधी मिळू शकेल. यामुळे भारत आणि आफ्रिका खंडातील देशांना अधिकाधिक व्यापार करता येईल.
आफ्रिका सौरऊर्जासंपन्न देश असून भारताच्या मदतीने या सौरऊर्जेचा वापर करून आपल्या ऊर्जा गरजा भागवू शकेल. भारत ११० युनिकॉर्नसह जगातील तिसरी सर्वात मोठी ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ असून ती आफ्रिकी देशांत ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’च्या निर्मितीत साहाय्यक ठरेल. औषधनिर्माण आणि आरोग्य क्षेत्रात भारत अग्रेसर असून कोरोनावरील प्रभावी लसनिर्मितीमुळे भारत आफ्रिकेला लसनिर्मितीत सहकार्य करु शकेल. पायाभूत सुविधांची निर्मिती आफ्रिकेतील कृषी उत्पादनांच्या दळणवळणाला सुलभ करेल, त्याचबरोबर एक मजबूत ‘डिजिटल’ पायाभूत सुविधा आर्थिक विकासात गती आणण्याचे काम करेल. याव्यतिरिक्त माहिती-तंत्रज्ञान, हिंदी महासागरातील लष्करी आदान-प्रदान, संरक्षण व्यापार, कायदेविषयक सेवा, विमा आणि कितीतरी अन्य बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रात भारत आणि आफ्रिकी देश एकत्र येऊन काम करु शकतात.
आफ्रिकन देशांकडे प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, पण त्याचा विनियोग करण्यासाठी पैसा नाही. पण, आता भारत आफ्रिकेची मदत करुन त्या देशांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करेल. आजपर्यंत कोणत्याही देशाने आफ्रिका खंडासाठी जे केले नाही, ते भारत करत आहे. आजपर्यंत विकसित युरोपीय देशांना आफ्रिकन देशांतले केवळ दारिद्य्र दिसत होते, तिथे भारताने विकासाच्या नव्या संधी ओळखल्या आणि आता भारत योजत असलेले उपाय दीर्घ काळापासून चालत आलेल्या भारत-आफ्रिका भागीदारीमध्ये योगदान देईल व त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल.