ठाणे : गेले अर्ध शतक म्हणजे ५० वर्ष आपल्या तुफान अभिनयातून प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. फक्त मराठीतच नाही तर हिंदीत देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव आणि वयाचा रौप्य महोत्सव सध्या त्यांचे चाहते सर्वत्र साजरा करत आहेत.
अशोक सराफ यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त नुकताच ठाण्यात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनयाबरोबरच त्यांच्या अनेक अपरिचित गुणांचे दर्शन प्रेक्षकांना घडले. त्यातलाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर फिरत आहे.
अशोक मामांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे 'मी बहुरुपी' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. अशोक मामांची पंच्याहत्तरी आणि मनोरंजन विश्वातील पन्नाशी या निमित्ताने ठाणे येथे अशोक मामांचा सत्कार करण्यात आला. त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मामा हे चक्क तबला वादन करताना दिसत आहे तर अभिनेता विघ्नेश जोशी हा पेटी वाजवताना दिसत आहे. अशोक सराफ यांचा हा पैलू बघून प्रेक्षक अवाक झाले होते.
यावेळी, 'तुम्ही तबला वादनाचे शिक्षण कधी घेतले?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मामा म्हणाले, 'मला कोणीही तबला वाजवायला शिकवले नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही. मला यातलं फारस काही कळत नाही. हा तबला कसा वाजवायचा मला कोणीच शिकवलेले नाही. पण मी वयाच्या जवळपास चार ते पाच वर्षांपासून तबला वाजवतोय. तबला वाजवताना बोटांचा वापर कसा करायचा याचा मला काहीही अंदाज नाही. पण मला जमतं. मी शास्त्रीय तबला शिकलेलो नाही. एकदा मला माझ्या मामांनी पंडित यशवंत बुवा केतकर यांच्याकडे तबला वादन शिकण्यासाठी पाठवले होते. मी एक दिवस गेलो. त्यांनी तबला वाजवण्याचे प्रशिक्षण दिले. अगदी बोटांचा वापर कसा करायचा हेही शिकवलं. पण मला ते आधीपासून जमत होतं. मी त्यांना एकदा तबला वादन करुन दाखवलं, तेव्हा ते म्हणाले अरे तुला येतंय. मी पुन्हा त्यांना विचारलं हे एवढंच आहे. त्यावर ते म्हणाले हो हे एवढंच आहे. तेव्हा मी म्हणालो अरे हे तर मला येतं त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्याकडे गेलोच नाही,' असा मजेशीर किस्सा यावेळी अशोक मामांनी सांगितला.