आता 'सलीम' नंतर 'मॅककॅन'ची गुजरात वारी!

दोन लेसर सोबतच एक ग्रेटर फ्लेमिंगो पोहोचला भावनगरला

    17-Jul-2022   
Total Views |
फ्लेमिंगो
 
 
 
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): ठाणे खाडी परिसरातील भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये या वर्षी दि. ३१ जानेवारी रोजी टॅग केलेला ग्रेटर फ्लेमिंगो 'मॅककॅन' दि. १५ जुलैला गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. तब्बल १५ तास सलग प्रवास करत या पक्ष्याने ३०० किमीचे अंतर काटले आहे.  एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला, तर सालीम दि. ७ रोजी, आणि आता मॅककॅन दि. १५ जुलै रोजी भावनगरला पोहोचला आहे.
 
 
मॅककॅन' हा ग्रेटर फ्लेमिंगो दि. १५ जुलै रोजी गुजरातला पोहोचला. ठाणे खाडी परिसरातील विख्रोळी पाणथळ प्रदेशातून १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता या पक्ष्याने प्रवास सुरू केला आणि दि.१५ रोजी सकाळी ८ वाजता घोघा बीचवर पोहोचला. या पक्ष्याने सलग प्रवास करत तब्बल ३०० किमीचे काटले. सध्या हा फ्लेमिंगो भावनगर विमानतळाजवळील पाणथळ प्रदेशात वास्तव्यास आहे. हा मुंबईहून गुजरातला जाणारा तिसरा फ्लेमिंगो आहे, तर पहिला ग्रेटर फ्लेमिंगो आहे. 
 
 
बीएनएचएसने 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्रकल्पाचा भाग म्हणून ठाणे खाडीतील 'लेसर' आणि 'ग्रेटर' फ्लेमिंगोचे स्थलांतर आणि अधिवास समजून घेण्यासाठी 'उपग्रह टेलिमेट्री अभ्यास' सुरू केला. याद्वारे शास्त्रज्ञांनी या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत भरतीच्या ठिकाणी सहा फ्लेमिंगो पकडले. त्यानंतर फ्लेमिंगोंवर सौर उर्जेवर चालणारे 'जीपीएस-जीएसएम' रेडिओ टॅग लावण्यात आले होते. या सहा फ्लेमिंगोना 'खेंगरजी' , 'लेस्टर' 'मॅककॅन' 'सलीम' 'हुमायून' 'नवी मुंबई' अशी नवे देण्यात आली होती.
 
 
सध्या, 'मॅककॅन' पक्षी भावनगर विमानतळाजवळील पाणथळ प्रदेशात वास्तव्यास आहे. बीएनएचएसचे माजी सहाय्यक क्युरेटर चार्ल्स मॅककॅन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव देण्यात आले होत. फ्लेमिंगोंचे खाद्य, प्रजनन आणि स्टॉपओव्हर साइट्सचे संरक्षण करण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. या अभ्यासानंतर त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती सुचवण्यात येणार आहेत.
“ हा फ्लेमिंगो रेडीओ टॅग करण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बरीच नवीन माहिती समोर येत आहे. पूर्वी असा समज होता की पावसाळा सुरू झाल्यावर लगेच हे पक्षी गुजरातकडे प्रस्थान करतात. परंतु, या पूर्वी दोन; आणि आता हा तिसरा फ्लेमिंगो पावसाळा सुरू होऊन काही दिवस गेल्यावर गुजरातकडे प्रस्थान करताना दिसत आहेत. सध्या ते भावनगरला असले तरी त्यांची पुढची वाटचाल पाहणे हे महत्वाचे ठरणार आहे. -राहुल खोत, उपसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.