वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा दहशतवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रेकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. काश्मीर खोर्यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले होते. पण, तरीही या यात्रेसाठीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.
मरनाथ येथे नुकत्याच झालेल्या ढगफुटीमध्ये पुण्यातील दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. सुमारे १५ हजार यात्रेकरूंना यादरम्यान सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सर्व यात्रेकरूंनी दि. १० जुलैला परतीचा प्रवास सुरू केला. अमरनाथमध्ये यंदा यात्रेच्या वेळी १० ते १२ हजार भाविक अडकले होते. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंची संख्या १६ वर पोहोचली. अजूनही काही जण चिखलगाळाच्या ढिगार्याखाली अडकल्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. येथे शोधकार्य अखंडपणे सुरू आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामुळे प्रत्येक यात्रेकरूला ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड’ देण्यात आले आहे. त्याद्वारेही या ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. पुरामुळे २५ तंबू उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच भाविकांना भोजन देण्यासाठी बांधलेल्या तीन सामुदायिक स्वयंपाकघरांचेही मोठे नुकसान झाले. ६५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जम्मू-काश्मीर पोलीस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ‘आयटीबीपी’, लष्कराकडून अमरनाथ येथे बचावकार्य राबविले जात आहे. दुसरीकडे दि. ११ जुलैलावातावरण खराब झाल्याने जम्मू मार्गाने होणारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. ढगफुटी आणि वातावरण खराब असल्याने पहेलगाम आणि बालताल येथून यात्रा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ येथील स्थिती पाहता, आरोग्य खात्यातील कर्मचार्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आणि रजेवर असलेल्या कर्मचार्यांना कामावर त्वरित हजर राहण्याचे निर्देश दिले गेले. याशिवाय सर्व शासकीय अधिकार्यांना फोनवर उपलब्ध राहण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
यंदा ही यात्रा तब्बल तीन वर्षांनंतर होत आहे. २०१९ मध्ये केंद्राने काश्मीरसाठीचे ‘कलम ३७०’ रद्द करण्यापूर्वी ही तीर्थयात्रा मध्येच रद्द करण्यात आली होती. ‘कोविड’ महामारीमुळे २०२० आणि २०२१ मध्ये ही तीर्थयात्रा झाली नव्हती. दि. ३० जूनपासून यात्रेला सुरुवात झाली असून, ४३ दिवस चालणार्या या यात्रेची दि. ११ ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. एक लाख भाविकांनी अमरनाथांचे दर्शन घेतले आहे. ४३ दिवस चालणार्या या वार्षिक यात्रेला दि. ३० जूनपासून दोन मार्गाद्वारे सुरुवात झाली. दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमधील पहलगाम-नुनवानपासून ४८ किलोमीटरचा पारंपरिक मार्ग आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बलताल या अन्य एका मार्गाने ही यात्रा सुरू होती. आतापर्यंत एक लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शनाचा लाभ घेतला आहे. दि. ११ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या यात्रेची सांगता होणार आहे. दि. २९ जूनपासून, जम्मूतील भगवतीनगर पायथ्याच्या यात्रा तळामधून एकूण ६९ हजार, ५३५ यात्रेकरू दहा तुकड्यांत रवाना झाले आहेत.
‘बम-बम भोले’च्या घोषणांनी वार्षिक अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. समुद्रसपाटीपासून ३ हजार, ८८८ मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी भाविकांनी सुरुवात केली आहे. सुरक्षेसाठी प्रशासनाने दोन लाख जवान तैनात केले आहेत.
मुसळधार पावसामुळे दुर्घटना
दरम्यान, हवामान विभागाने सांगितले की, ही दुर्घटना ढगफुटीमुळे झाली नसून, स्थानिक पातळीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे झाली आहे. या परिसरात शुक्रवारी दुपारी ४.३० ते ६.३० पर्यंत ३१ मिलीमीटर पाऊस पडला, जो ढगफुटीसारख्या घटनेच्या दृष्टीने कमी आहे. अमरनाथ गुहेजवळील पर्वतांच्या उंच शिखरांवर पावसामुळे अचानक पूर आला असावा. तासाभरात १०० मिलीमीटर पाऊस पडल्यास त्याला ‘ढगफुटी/क्लाऊड बर्स्ट’ म्हणून गणले जाते. ‘क्लाऊड बर्स्ट’ ही एका छोट्या भागात कमी कालावधीत अतिवृष्टीची घटना आहे. असा पाऊस जोरदार असतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अचानक २० ते ३० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळात १०० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो, तेव्हा त्याला ‘क्लाऊड बर्स्ट’ म्हणतात. ‘क्लाऊड बर्स्ट’ कधी होईल हे आगाऊ सांगणे कठीण असते. ‘क्लाऊड बर्स्ट’ आणि मुसळधार पाऊस यात, तीव्रतेव्यतिरिक्त, फरक म्हणजे अतिवृष्टीचा अंदाज लावला जाऊ शकतो. ढग सहसा डोंगराळ भागातही फुटतात. हिमालयात आदळल्यानंतर मान्सूनचे ढग हळूहळू मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि ‘क्लाऊड बर्स्ट’चे वातावरण निर्माण होते. जुलै-सप्टेंबरमध्ये मान्सून सर्वाधिक सक्रिय असतो. यामुळेच अनेकदा ‘क्लाऊड बर्स्ट’ होते. हवामान बदलामुळे ‘क्लाऊड बर्स्ट’च्या घटनांमध्येही वाढ होत असून त्यांची तीव्रताही वाढत असल्याचे अनेक अभ्यासांतून दिसून आले आहे. ‘क्लाऊड बर्स्ट’च्या वाढत्या घटनांमुळे अचानक पूर येणे, डोंगर कोसळणे, मातीची धूप होणे आणि जमीन खचणे या घटनांमध्येही वाढ होणार आहे.
बचावकार्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
अमरनाथजवळील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. लष्कराने बचावकार्यासाठी तंत्रद्यानाचा वापर करत त्याद्वारे ढिगार्यांखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला गेला. दोन वॉल रडार आणि दोन स्निफर डॉग त्याठिकाणी नेण्यात आले. त्यांना शरीफाबाद येथून हेलिकॉप्टरने बचावकार्यासाठी घटनास्थळी आणण्यात आले होते. बचावकार्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करत त्याद्वारे ढिगार्यांखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला. पुराच्या ढिगार्याखाली दबलेल्या सैनिक आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी लष्कराने ‘वॉल पेनिट्रेशन रडार’चा वापर केला आहे.दहशतवादविरोधी कारवाईत घर आणि भिंतींच्या मागे लपलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण शोधण्यासाठी लष्कराकडून या रडारचा वापर केला जातो. हे रडार भिंतीच्या मागे स्थिर आणि हलणारे लक्ष्य शोधू शकते. या रडारचा वापर अमरनाथ गुफेजवळील ढिगार्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी केला जात आहे. ‘वॉल पेनिट्रेटिंग रडार’ उच्च रिझोल्यूशनसह उच्च वारंवारता रेडिओ लहरी सोडते. त्या लहरी वस्तूवर आदळतात आणि त्याची उपस्थिती जाणवते. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींवर आधारित आहे. ते भिंत ओलांडण्यास सक्षम आहे. आता हे तंत्रज्ञान तपासासाठी वापरले जात आहे.
जीव धोक्यात घालून खडतर प्रवास
अमरनाथ यात्रा ही वर्षानुवर्षांपासून भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. अत्यंत खडतर प्रवास करून, अनेकदा जीव धोक्यात घालून लाखो भाविक तेथे पोहोचतात. अनेकदा अपघातही होतात. यापूर्वी अमरनाथ यात्रेकरूंवर हल्लेदेखील झाले आहेत.
वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा दहशतवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रेकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. काश्मीर खोर्यातील मूठभर पाकिस्तानवादी फुटीरतावाद्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले होते. पूर्वी चार महिने चालणारी ही यात्रा ५५, ४८, ४५ आणि आता तर फक्त ३५ दिवसांपर्यंत कमी करून टाकली होती.
दरवर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान शे-दोनशे भाविकांचे अपघाती मृत्यू होतात. कुणी वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे प्राण सोडतात. कुणी थंडीवार्यात कुडकुडून मरतात. पण, तरीही अमरनाथच्या यात्रेला जाणार्या यात्रेकरुंची संख्या दरवषी वाढत आहे. या यात्रेच्या वेळी टाळता येण्याजोगे अपघात टाळून यात्रेकरू मृत्युमुखी पडू नये व जखमी होऊ नये, यासाठी अमरनाथ मंदिराकडे जाणार्या मार्गांसंबंधी पायाभूत सोयीत प्रचंड सुधारणा करण्यात आली आहे. जगभरात कुठेही अमरनाथ यात्रेसारखी सर्वपंथसमभावाचा संदेश देणारी यात्रा असू शकत नाही. ही यात्रा पुन्हा आरंभ होण्याचे श्रेय एका मुस्लीम फकिराला दिले जाते. या यात्रेतील सर्व कुली आणि घोडेवाले मुस्लीम बांधव असतात. अमरनाथ यात्राकाळातच या सर्वांची वर्षभराची कमाई होऊन जाते. सरकारद्वारे निर्धारित केलेले दर कितीतरी कमी असतात, पण यात्रेकरू त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा श्रद्धेपोटी देऊन जातात. यात्रेकरूंकडून होणारा खर्च हाच अमरनाथ यात्रेच्या परिसरात राहणार्या लोकांच्या अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे.
इसवी सन पूर्व ३२च्या ग्रंथांमध्येही या यात्रेचा गौरवाने उल्लेख करण्यात आलेला आहे. अकराव्या शतकात १२ हजार ७५६ फूट उंचीवरील या गुहेतील शिवाच्या दर्शनासाठी गेलेल्या काश्मीरच्या महाराणी सूर्यमतीने तेथे त्रिशूळ अर्पण केले होते. आदी शंकराचार्य, भगवान स्वामिनारायण, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांनी अतिशय अवघड अशी अमरनाथची यात्रा केली आहे. ही यात्रा भारताची एकता, प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.