
जयपूर: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात शिरच्छेदाचा नारा देणाऱ्या गौहर चिश्तीला पोलिसांनी दि.१४ जुलै रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. दि. १७ जून रोजी गौहर चिश्तीने अजमेर दर्ग्याच्या बाहेर आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या.
चिश्तीने कन्हैय्यालालच्या मारेकऱ्यांपैकी एकाचीही भेट घेतली होती. अटक आरोपी गौहर चिश्तीचे पाकिस्तान 'कनेक्शन'ही समोर आले आहे. तो पाकिस्तानातील 'दावत-ए-इस्लामी' या कट्टरपंथी संघटनेच्या काही लोकांच्या नियमित संपर्कात होता. उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांड आणि अजमेरमधील प्रक्षोभक घोषणाबाजीप्रकरणी राजस्थान 'एटीएस'च्या तपासादरम्यान ही बाब समोर आली आहे.
अजमेरचे अतिरिक्त 'एसपी' विकास सांगवान म्हणाले, “गौहर चिश्तीला हैदराबाद, तेलंगण येथून पोलिसांनी अटक केली. त्याने दि.१७ जून रोजी दर्ग्याच्या बाहेर आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. शुक्रवारी पोलिसांचे पथक त्याला 'ट्रान्झिट रिमांड'वर अजमेरला आणणार आहे. गौहर चिश्ती यांच्या प्रक्षोभक भाषणाबद्दल दि. २५ जून रोजी 'एफआयआर' दाखल करण्यात आली होती . तेव्हापासून तो फरार होता आणि दि. २९ जून रोजी राजस्थानमधून बाहेर पडला होता. त्याला गुरुवारी हैदराबादमधून अटक करण्यात आली. गौहर चिश्ती हा अजमेर दर्ग्याचा खादिम असून त्याने प्रक्षोभक भाषणे केली आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांचा शिरच्छेद करण्यासाठी अजमेर दर्ग्याच्या बाहेर घोषणाबाजी केली. त्यानंतर तो अजमेर सोडून दि. २३ जूनपासून फरार होता.
गौहर चिश्तीलाही दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी 'सीआरपीएफ कॅम्प'चा व्हिडिओ बनवल्याबद्दल अटक केली होती, मात्र त्यावेळी त्याला केवळ इशारा देऊन सोडून देण्यात आले होते. कन्हैयालाल खून प्रकरणाच्या तपासादरम्यान, पाकिस्तानस्थित कट्टरपंथी संघटना 'दावत-ए-इस्लामी'चे काही लोक भारतातील अनेक लोकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. यामध्ये कन्हैयालालचे मारेकरी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद तसेच अजमेर दर्ग्याचे खादिम गौहर चिश्ती यांचीही नावे पुढे आली आहेत.