पाटणा: २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र रचल्याचा खुलासा पाटण्यातून पर्दाफाश केलेल्या ‘दहशतवादी नेटवर्क’मधून उघड झाला आहे. पाटणा दौर्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यासाठी त्यांनी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. नुपूर शर्मांसह इस्लामविरोधात बोलणार्यांची यादी या दहशतवाद्यांनी तयार केली होती. राजस्थानातील उदयपूर आणि महाराष्ट्रात अमरावतीत झालेल्या प्रकरणांसारखा बदला घेण्याची योजनादेखील या दहशतवाद्यांनी आखली होती. ‘एएसपी’ मनीष कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पंतप्रधानांच्या दौर्याच्या एक दिवस आधी पोलिसांनी अतहर परवेझ आणि मोहम्मद जलालुद्दीन या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. अतहरने पोलिसांना सांगितले की, “या मोहिमेत २६ जणांचा सहभाग होता व त्यांचे प्रशिक्षण पाटणा येथे सुरू होते. हे सर्व लोक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘पीएफआय’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘एसडीपीआय’शी संबंधित होते.
दहशतवाद्यांकडून सापडलेल्या ‘इंडिया २०४७’ नावाच्या दस्तावेजातून ही बाब समोर आली आहे. पोलिसांना सात पानी कागदपत्र मिळाले आहे. त्यात संपूर्ण नियोजनाचा उल्लेख आहे. पाटण्यातील फुलवारी शरीफच्या ‘अहमद पॅलेस’च्या दुसर्या मजल्यावर प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये बिहारच्या बाहेरचे लोकही येत होते.
पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाटणा दौर्याच्या एक दिवस आधी, म्हणजे दि. ११जुलैच्या संध्याकाळी, ‘आयबी’ने दिलेल्या माहितीच्या आधारावरून नया टोला येथे छापा टाकला आणि अतहर आणि जलालुद्दीनला पकडले. त्याच्या बँक खात्यातून ८० लाखांहून अधिक व्यवहार झाले आहेत. २००१, २००३ आणि २०१३ मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये अतहरचा सहभाग असल्याची माहितीही मनीष कुमार यांनी दिली. याची खातरजमा पोलिसांनी केली आहे. दि. ६-७ जुलै रोजी बिहार, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील तरुणांना ‘मार्शल आर्ट’च्या नावाखाली प्रशिक्षण देण्यात आले. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट आखण्यात आला होता.
पोलिसांनी त्यांच्या अड्ड्यावरुन अनेक आक्षेपार्ह ‘बॅनर’, ‘पॅम्प्लेट’, व्हिडिओ आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. दि. ११ जुलैपासून दोघांची चौकशी सुरू होती. पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी दोघांनाही माध्यमांसमोर हजर केले. ‘एएसपी’ मनीष कुमार यांनी सांगितले की, “अतहरची वेगवेगळ्या बँकांमध्ये तीन खाती आहेत. त्यापैकी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत. तिन्ही खाती गोठवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.”
‘सिमी’च्या जुन्या सदस्यांना जोडून बनवल्या जात होत्या गुप्त संघटना
अटक करण्यात आलेला मोहम्मद जलालुद्दीन प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. आता तो ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सक्रिय सदस्यदेखील आहेत. चौकशीदरम्यान, ‘सिमी’चे माजी सदस्य ’पीएफआय’शी जोडले जात असल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांना जोडून गुप्त संघटना तयार केली जात आहे. या गुप्त संघटनेला मोठे लक्ष्य देण्यात आले आहे.
निवृत्त पोलीस अधिकारीच दहशतवादी
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी झारखंड पोलिसांचा निवृत्त पोलीस अधिकारी जलालुद्दीन आणि त्याचा साथीदार अतहर परवेझ आहेत. या दोघांवर ‘मार्शल आर्ट’ आणि शारीरिक शिक्षण देण्याच्या नावाखाली शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. दोघांवरही धार्मिक कट्टरता पसरवल्याचा आणि दहशतवादी कारवाया केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.