मुंबई : सर्वांचा आवडता अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच खूप धक्का बसला होता. त्यांनतर अनेक जणांची तपासणी करण्यात आली, अनेक संशयित पकडण्यात आलेत. आणि पुन्हा सगळं पूर्ववत झालं होतं. परंतु, आता पुन्हा एकदा नवा खुलासा करण्यात आला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. त्यामुळे काल रात्री पुन्हा एकदा सुनावणी करण्यात आली. ३५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
रिया चक्रवर्तीने आपला भाऊ शौविक आणि अन्य आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतसिंह राजपूतला दिला होता. या संदर्भात एनसीबीने दावा केला की, रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सगळ्या आरोपींनी एकमेकांसोबत मार्च २०२० पासून डिसेंबर २०२० पर्यंत कारस्थान रचले आणि बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्सचे वाटप आणि खरेदी विक्री केली. या आरोपींनी मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीला वित्तपुरवठा केला, तसेच गांजा, चरस, कोकेनसारख्या अमली पदार्थांचा पुरवठा केला. त्यामुळे आता सर्व आरोपींच्या विरोधात कलम २७ आणि २७ ए, २८ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
परंतु तरीदेखील न्यायालय सर्व आरोपींवरील आरोपांवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी , त्यांना दोषमुक्त करणाऱ्या याचिकेवर विचार करणार आहे. या ड्रग्जप्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी यांनी या प्रकरणातल्या सुनावणीसाठी २७ जुलै ही ताऱीख दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी १५ दिवसांनंतर होईल.