कुंचल्याचा जादूगार

    13-Jul-2022   
Total Views |

myuresh

 
 
 
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपल्या चित्रकलेतील उत्तुंग प्रतिभेने यशाला गवसणी घालणार्‍या नाशिकच्या मयुरेश आढावविषयी...
 
 
कुठल्याही कलाकाराचा कलेच्या प्रांतातला प्रवास हा एक प्रकारे आत्मशोधाचा प्रवास असतो. यशाची शिखरे गाठणारे दिग्गज कलाकारदेखील एका टप्प्यावर नवखे असतात. परंतु, वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपल्या चित्रकलेतील उत्तुंग प्रतिभेने यशाला गवसणी घालणारा नाशिकचा मयुरेश आढाव सगळ्या समीकरणांचा पुनर्विचार करायला भाग पाडतो.
 
 
नाशिकरोड स्थित स्व. जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्‍या मयुरेशने कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रात, देशात व अगदी विदेशातही आपली एक ओळख निर्माण केली आहे. एखाद्या कलाकारामध्ये कलेविषयी उपजतच जाण असणे, माध्यमांची समज असणे ही खरेतर त्याला मिळालेली दैवी देणगीच! मयुरेश अशीच दैवी देणगी घेऊन आलेला असावा असेच त्याने साकारलेली चित्रे पाहताना वाटून जाते. अगदी बालवाडीपासून चित्र काढण्याची आवड असणारा मयुरेश खेळण्यांचा हट्ट न करता चित्रकलेसाठी आवश्यक असणार्‍या रंगांचा, कागदाचा, पेन्सिलीसाठीचा हट्ट करू लागला. चित्रांना रंग देणे, प्राणी, पक्षी, विविध आकार रेखाटने मयुरेश करत होता. सुरुवातीला बाळबोध वाटणार्‍या या चित्रांची अल्पावधीतच झालेली प्रगती या मुलामधील चित्रकलेचे गुण दर्शवून गेली. त्याच्या चित्रांमध्ये होत असणारी सुधारणा पाहता त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळायला हवे, यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न केला. त्याचदरम्यान आयोजित एका चित्रकला स्पर्धेत ‘अ‍ॅक्रेलिक कलर्स’चा वापर करून मयुरेश त्याच्या लहानग्या वयोगटात यशस्वी व वेगळा तर ठरलाच, परंतु चित्रकलेच्या क्षेत्रातली त्याची वाटचाल निश्चित झाली.
 
 
जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा अनेक स्पर्धांमधून मयुरेशने यश मिळवायला सुरुवात केली. त्याच्या कॅनवासवर आता अनेक विषयांवरील चित्र साकारू लागली. निसर्गचित्र, अभिनेत्यांप्रमाणेच शिवाजी महाराज या आपल्या आदर्शाचे चित्र काढण्यास त्याला आवडते.कोरोना काळातील ‘लॉकडाऊन’मध्ये वेळेचा सदुपयोग करत मयुरेशने स्वयंशस्तीचे पालन करत अभ्यासाव्यतिरिक्त आपला वेळ चित्रकलेसाठी देण्यास सुरुवात केली. रोज त्यांचे नवनवीन व्हिडिओ, त्यांची चित्र काढण्याची पद्धती या गोष्टी तो शिकू लागला. काढलेली नवीन चित्रे वडिलांच्या मदतीने त्याने समाजमाध्यमांवर पोस्ट करायला सुरुवात केली आणि नाशिकच्या या कलाकाराने संपूर्ण विश्वातून पसंतीची पावती मिळवली.
 
 
शालेय अभ्यासक्रमाकडे लक्ष दिले जावे, याकडेच पालकांचा कल असतो. अभ्यासक्रमाबरोबरच चित्रकलेकडेदेखील मयुरेशने गांभीर्याने पाहायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या पालकांनादेखील असेच सल्ले देण्यात आले. ज्या अभ्यासाचे रूपांतर पुढे एखाद्या करिअरमध्ये होऊ शकते, तोच अभ्यासक्रम निवडला जावा, असा सर्वसाधारण आग्रह असताना मयुरेशच्या आई-वडिलांनी मात्र त्याच्या कलेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आज योग्य ठरताना दिसतो, तेव्हा त्यांना समाधान वाटत असल्याची भावना ते व्यक्त करतात. आपण जी वाट निवडलेली आहे, त्यात यश प्राप्त करायचे असेल, तर शिस्त, साधना, कष्ट, एकाग्रता गांभीर्य आणि जबाबदारी यांचे पालन करायला लागेल, याची जाणीव मनात बाळगताना मयुरेश दिसतो. चित्र काढताना चारकोल हे माध्यम आवडणार्‍या मयुरेशने या माध्यमातून काढलेल्या ‘पीसफुल मेन’ या चित्राला पारितोषिक मिळाले आहे. ’द-डिव्होटी’, क्रो ट्राईब’, ’ईनर पीस’, ’मंकी बस्कर’, ’राजा रविवर्मा’, ’चायनीज फिशरमन’ ही देखील त्याची नावाजलेली चित्रे. पोट्रेट काढणे आपल्याला आव्हानात्मक वाटते, असे मयुरेश सांगतो. समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचे योग्य भाव चित्रात उमटणे यासाठी तो सातत्याने सराव करतो. विविध माध्यमातून आपण रेखाटलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे पोर पाहून ते स्वतः शाबासकी देतात, तेव्हा तसेच शाळेत आपल्या नावामागे आता चित्रकार असे देखील म्हटले जाते, हे पाहून विलक्षण आनंद होत असल्याचे मयुरेश आवर्जून सांगतो.
 
 
९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील बालकुमार साहित्य मेळाव्यात लाईव्ह चित्र काढण्याच्या मिळालेल्या संधीतून त्याने अनेक दिग्गजांच्या समोर आपली चित्रकला सादर केली. अशा या मयुरेशला ‘नाशिकरत्न’ व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध चित्रकार पिकासो, राजा रविवर्मा, एम एफ हुसेन तसेच आताच्या काळातील प्रमोद कांबळे, प्रफुल सावंत, राजेश सावंत, के. क्रिशन कुंद्रा, सौरभ जोशी आदी त्याचे आदर्श आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार होण्याचा प्रयत्न करून संपूर्ण विश्वात भारताचे नाव आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून उमटवण्याचा त्याचा मानस आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.