मुंबई(प्रतिनिधी): मुंबईतील विरारच्या मारंबळपाडा येथील कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. गावांमध्ये कांदळवनाबाबत जागरूकता आणि इको टुरिझमला चालना मिळण्यासाठी यामुळे हातभार लागणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कांदळवन कक्षाने मारंबळपाडा, विरार येथे मुंबई महानगर प्रदेशातील पहिले इको टुरिझम गाव विकसित करण्याची योजना आखली आहे. मारंबळपाडा येथील कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र हे या परिसरातील पर्यावरण-पूरक पर्यटन विकसित करण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे.
'कांदळवन इको टुरिझम प्रोजेक्ट'च्या अंतर्गत कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र हे अनेक उपक्रमांसाठी मोक्याचे ठिकाण ठरणार आहे. येथे भेट देणाऱ्यांसाठी कांदळवनात बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, पक्षी निरीक्षण, मॅनग्रोव्ह बोर्डवॉक, बेटाला भेट असे अनेक उपक्रम विरार परिसरात उपलब्ध असतील. हे केंद्र महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मालकीच्या जागेवर उभारले असून, त्यासाठी बोर्डाने ना हकरत प्रमाणपत्र दिले आहे. किनारपट्टी विनियमन क्षेत्रांतर्गत हे ठिकाण असल्यामुळे या परिसरातील कांदळवनांचे कोणतेही नुकसान न करता तीन कंटेनरच्या माध्यमातून हे केंद्र बांधण्यात आले आहे.
या केंद्राला भेट देणाऱ्यांसाठी स्थानिक आणि त्यांची संस्कृती, कांदळवन आणि अनुषंगिक जैवविविधता या बाबतच्या माहितीचे आकर्षक पद्धतीने मांडलेले प्रदर्शन पाहायला मिळेल. या केंद्राला योग्य असे कुंपण आणि सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा आहेत. या केंद्राचा खर्च सुमारे 45 लाख रुपये असून त्यामध्ये इनर व्हील क्लबचे 15 लाख रुपयांचे योगदान आहे. तर उर्वरित निधी हा कांदळवन कक्षांतर्गत असलेल्या कांदळवन प्रतिष्ठानाकडून देण्यात आला आहे. इको-टुरिझम गावासाठी दहा लाख रुपयांच्या बोटीची खरेदी केली असून, ‘इंद्रायणी’ असे तिचे नामकरण केले आहे. या बोटीचे संचालन गावकऱ्यांमार्फत होईल. या बारा आसनी बोटीतून पर्यटकांना कांदळवनाची सुंदर झलक पाहता येईल. ही बोट कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये एक लाख रुपये हे समूहातील सदस्यांनी तर नऊ लाख रुपये कांदळवन प्रतिष्ठानाकडून देण्यात आले आहेत.
“मारंबळपाडा केंद्राच्या विकासामुळे येथील पर्यावरण-पूरक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच येथे भेट देणाऱ्यांच्या अनुभवात भर पडणार आहे. तसेच स्थानिकांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण होणार आहे. या केंद्रामुळे स्थानिकांचा कांदळवन संवर्धनातील सहभाग वाढण्यास प्रोत्साहन मिळेल.” -अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) विरेंद्र तिवारी