बारवी प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला अखेर यश

प्रकल्पग्रस्तांना महापालिका, नगरपालिकांमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू

    01-Jul-2022
Total Views | 49
 
barvi
 
 
बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना महापालिका, नगरपालिकेत नोकरीमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका यांना याबाबत पत्र पाठविल्याची माहिती नुकतीच भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली.
 
 
 
जागेच्या मोबदल्यात भरपाई मिळाल्यानंतरदेखील या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी यासाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षाला यश आले असून प्रकल्पग्रस्तांनादेखील आता नोकरीत सामावून घेतले जात आहे. ठाणे जिल्ह्यात तब्बल ४१८ प्रकल्पग्रस्तांना महापालिका व नगरपालिकांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. बदलापूरच्या बारवी धरणावर उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्याने या धरणात ३४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या अतिरिक्त पाण्याचा पुरवठा ठाणे महापालिका क्षेत्र, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका आणि ‘स्टेम’ या प्राधिकरणाला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांना ज्या प्रमाणात पाणीपुरवठा होतोय त्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीची हमी देण्यात आली आहे.
 
 
 
प्रकल्पग्रस्तांच्या १२०४ कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ६२७ बारावी प्रकल्पबाधितांना नोकरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने पहिल्या टप्प्यात २०९ प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःच्या विभागात सामावून घेतले आहेत, तर उर्वरित ४१८ लाभार्थ्यांना जिल्ह्यातील विविध महापालिकांमध्ये सामावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या ४१८ लाभार्थ्यांपैकी ठाणे महानगरपालिका २९, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका १२१, नवी मुंबई महापालिका ६८, मीरा-भाईंदर महापालिका ९७, उल्हासनगर महानगरपालिका ३४, अंबरनाथ नगरपालिका १६, कुळगाव बदलापूर नगरपालिका १८ आणि स्टेम ३५ अशा तब्बल ४१८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक कुटुंबात एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121