वनसेवेत जंगलांच्या संरक्षणाबरोबरच लोकसंवाद महत्त्वाचा असतो. मनमोकळेपणा हा स्वभावगुण असलेले वनसंरक्षक नानासाहेब सीताराम लडकत यांच्याविषयी...
वन विभागात गेल्या ३५ वर्षांपासून सेवा देणारा हा अधिकारी. मनमोकळा आणि तितकाच कामसू. अतिक्रमण निर्मूलन, वन्यजीव, पुनर्वसन, वन गुन्हे अशा वन विभागातील सर्व परिघांमध्ये कामाचा अनुभव असलेला. प्रसंगी मनमुरादपणे लोकांशी संवाद साधणारा आणि सायकलप्रेमी असलेला. प्रदीर्घ सेवेचा मान मिळवत सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेले हे अधिकारी म्हणजे नानासाहेब लडकत.
लडकत यांचा जन्म दि. १ जून, १९६३ अहमदनगर जिल्ह्यातील कारवाडी या लहानशा खेडेगावात झाला. घरची परिस्थिती तशी सर्वसामान्य होती. सात भावंडांमध्ये नानासाहेब लडकत हे सगळ्यात धाकटे होते. घरची पार्श्वभूमी शैक्षणिक स्वरुपाची नव्हती. अशा परिस्थितीत नानासाहेब यांनी मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी धुळे येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या महाविद्यालयामधून विज्ञान शाखेतून कृषीशास्त्राची पदवी मिळवली, तर राहुरी येथे कृषीशास्त्रामध्येच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. या शिक्षणादरम्यानच त्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख झाली. १९८५ साली लडकत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. योगायोगाने ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आणि त्यांनी महाराष्ट्र वन सेवेची वाट निवडली.
१९९६ साली लडकत वन विभागात रूजू झाले. त्यापुढील दोन वर्ष त्यांनी कोईम्बतूर येथे वन प्रशिक्षण घेतले. १९८८ साली त्यांना पहिली नियुक्ती अमरावती जिल्ह्यातील मेळघाट पूर्व या वनपरिक्षेत्रात मिळाली. साहाय्यक वनसंरक्षक या पदावर ते काम करू लागले. सतत शिकण्याच्या वृत्तीमुळेच त्यांनी या काळात देहरादूनच्या ’भारतीय वन्यजीव संस्थान’मधून (डब्लूआयआय) वन्यजीवविषयक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ते पुन्हा मेळघाटला पुन्हा रूजू झाले. मेळघाटमधील आपल्या कार्यकाळादरम्यान लडकत यांनी पुनर्वसन नियोजनाचे मुख्य काम केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशानुसार ’प्रोजेक्ट टायगर’अंतर्गत मेळघाटमध्ये पुनर्वसनासाठी पार पडलेले पहिले सर्वेक्षणलडकत यांनी केले. १९९४ साली त्यांची बदली मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाली. त्यावेळी राष्ट्रीय उद्यानाची हद्द ही अतिक्रमण आणि खाणकामांनी वेढलेली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीची आणि त्याच्या अंमलबजावणीची सर्व जबाबदारी लडकत यांनी सांभाळली. न्यायालयाने अतिक्रण निर्मूलनाबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीचा पाया लडकत यांच्या कार्यकाळातच रचला गेला. त्यांनी नियोजितरित्या राष्ट्रीय उद्यानाला लागलेला खाणकामाचा विळखा सोडवण्यामध्ये मोठे काम केले.
१९९७ साली लडकत यांची बदली राजगुरूनगर येथे सामाजिक वनीकरण प्रशिक्षण केंद्रात झाली. त्याठिकाणी तीन वर्ष काम केल्यानंतर २००१ साली त्यांना नाशिक (पू) वन विभागात काम करण्याची संधी मिळाली. २००६ साली त्यांना विभागीय वन अधिकारी या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. नागपूर येथे विभागीय वन अधिकारी दक्षता म्हणून त्यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी वन्यजीव गुन्ह्यांसंदर्भात काम केले. २००९ साली त्यांची बदली विभागीय वन अधिकारी दक्षता, धुळे येथे झाली. याठिकाणी त्यांनी अवैध वृक्षतोड आणि त्याच्या वाहतुकीसंदर्भातील गुन्ह्यावर जबर कारवाई केली. परराज्यातून येणारे साग आणि रक्त चंदनांची झाडांची तस्करी त्यांनी रोखली.
२०१४ साली लकडत हे सामाजिक वनीकरण-पुणे विभागाच्या उपसंचालक पदावर रूजू झाले. येथील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वृक्ष लागवडीसंदर्भातील बरीच कामे करून घेतली. २०१६ साली त्यांनी भारतीय वन सेवेत (आयएफएस) पद्दोन्नती मिळाली. उपवनसंरक्षक डहाणू येथे ते रूजू झाले. याठिकाणी अतिक्रमण निर्मूलनाबरोबरच रल्वे आणि रस्ते विस्तारीकरणामध्ये येणार्या वनांचे नियोजनाचे काम त्यांनी केले. शिवाय महाराष्ट्रातील पहिल्या समुद्री कासव उपचार केंद्राचे व्यवस्थापनही केले. २०१८ साली त्यांची बदली ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक (गाभा) या पदावर झाली. यावेळी त्यांनी गाभा क्षेत्रातील ताडोबा तलावाजवळ असलेले वनविभागाचे कार्यालय आणि कर्मचारी वसाहतीच्या स्थानांतरणाचे मोठे काम केले. त्यामुळे गाभा क्षेत्रातील तो भाग मानवविरहित झाला. सोबतच गाभा क्षेत्रातील पळसगावाचे पुनर्वसन केले. जोडीनेच कोळसा आणि रानतळोधी या गावांच्या पुनर्वसनाच्या कामाचा पायाही रचला. शिवाय गाभा क्षेत्रातील व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी तीन वनपरिक्षेत्रांचे रुपांतरण पाच वनपरिक्षेत्रांमध्ये केले.
२०२० साली लडकत यांना वनसंरक्षक पदावर पदोन्नती मिळाली. कार्याआयोजन पुणे येथे त्यांनी पदभार स्वीकारला. दोन वर्ष याठिकाणी काम केल्यानंतर २०२२ मध्ये त्यांची नियुक्ती ‘सह्याद्री व्याघ्र’ प्रकल्पाच्या वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पदावर झाली आहे. ताडोबा आणि मेळघाटप्रमाणेच ‘सह्याद्री व्याघ्र’ प्रकल्पाचा चेहरो-मोहरा बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. प्रकल्पातील संरक्षण कुटी आणि कर्मचारी वसाहत यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनेदेखील त्यांचे काम सुरू आहे. वन विभागात ३५ वर्षांची वनसेवा देणार्या या मनमोकळ्या अधिकार्याला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!