मुंबई : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवारी (दि. ८ जून) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपकडून एकूण पाच नावं घोषित करण्यात आली. मात्र भाजपने आपला आणखी एक पत्ता उघडल्याचे गुरुवारी दिसून आले. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत हे अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये जोरदार चुरस सुरू असताना सदाभाऊ खोत यांनी निवडणूक रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
भाजपतर्फे 'हे' नेते जाणार विधान परिषदेवर
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह प्रा. राम शिंदे, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या नावांना भाजपने पसंती दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, चौधरी भुपेंद्र सिंह, दयाशंकर मिश्र दयालू, जे. पी. एस. राठौर, नरेंद्र कश्यप, जसवंत सैनी, दानिश आझाद अन्सारी, बनवारीलाल दोहरे, मुकेश शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बिहार विधानपरिषदेसाठी हरि साहनी आणि अनिल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.