नवी दिल्ली: एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी याती नरसिंहानंद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. या आधी दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने नुपूर शर्मा नवीन जिंदाल यांच्या समवेत ९ जणांवर एफआयआर दाखल केली होती. पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त विधाना नंतर असदुद्दीन ओवैसी व स्वामी याती नरसिंहानंद यांनी समाजात तेढ निर्माण होईल अशी भडकाऊ वक्तव्य केली होती. म्हणून आयपीसी कलम १५३,२९५ आणि ५०५ नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यावर लगेच एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी संसद भवन रस्त्यावर उतरून नुपूर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी एआयएमआयएमच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी याती नरसिंहानंद यांच्या शिवाय सबा नक्वी व मीडिया क्षेत्रातील काही लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार काही लोक समाजात द्वेष पसरवत आहेत. सांप्रदायिक भावना भडकवून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशी कारस्थानं रचत आहेत .
काही दिवसांपूर्वी ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंग प्रकरणी एका टीव्ही चॅनेलवरील चर्चे दरम्यान नुपूर शर्मा यांनी पैगंबर महोम्मद यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकाऊ वक्तव्य केली. त्याबद्दल दिल्ली पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. नुपूर शर्मांच्या विधानाने अरब राष्ट्रांसमवेत जगभरातून भारतावर टीका होऊ लागली. भारतीय जनता पक्षाने देखील या वक्तव्या नंतर नुपूर शर्मा यांचं पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबन केलं. पैगम्बर मोहोम्मद यांच्यावरील विधानानंतर नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. त्याविरोधात दिल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी नुपूर शर्मा यांना पोलीस संरक्षण देखील पुरवले आहे.