मुंबई : महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. भाजपच्या संघटनात्मक बांधणीत काम करणारे श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे आणि भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपतर्फे विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून त्याकरिता ९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक असे उमेदवार निवडून येतील असे सध्याच्या आकडेवारीनुसार स्पष्ट आहेत. तर अखेरच्या दहाव्या जागेसाठी राज्यसभेप्रमाणेच पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस रंगणार आहे.
पाचवी जागा जिंकण्याचा विश्वास
माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे पाचही उमेदवार आजच अर्ज दाखल करणार असून परिषदेची पाचवी जागा देखील आम्ही जिंकून आणणार असल्याचा विश्वासही चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केला आहे.