
मुंबई: सह्याद्री वाहिनीचे सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये जवळपास ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
''नमस्कार, मी प्रदीप भिडे'', म्हणत त्यांनी भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली. दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रुची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावं असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.
मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे त्यांनी 'प्रदीप भिडे कम्युनिकेशन' या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला. रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केलं होतं. स्वत:च्या आवाजावर त्यांनी आर्थिक प्राप्ती करण्याच्या निर्णय घेतला आणि खरा ठरवला.
प्रदीप भिडे यांनी आत्तापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना ‘आवाज’ दिला असून सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन निवेदन केले आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले होते. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
काही आठवणी....!
शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेही काही जाहीर कार्यक्रम आणि अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले होते.
महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात
प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला.