(भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत एमआयएमआयएमच्या आमदाराच्या मुलावर आरोप केले )
हैद्राबाद: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा हैद्राबादच्या जुबली हिल्स येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही फोटोमध्ये एआयएमआयएम आमदाराच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी न्यायालय आपलं काम योग्य रीतीने करेल अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षाच्या सदुद्दिन मालिकसह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून अजून एका आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती हैद्राबाद पश्चिम झोनचे पोलीस उपायुक्त जोल डेवीस यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील पाच पैकी चार आरोपींना ताब्यात घेतलं असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. पीडित मुलगी २८ मे ला पब मध्ये गेली असता एका कार मध्ये तिच्यावर तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. सोमवारी ( ६ जून) पीडितेने मॅजिस्ट्रेट पुढे आपला जबाब नोंदवला. त्यावेळी आरोपींनी अजून एका मुलीचा विनयभंग केल्याची माहिती पुढे आली.
या प्रकरणावर आधारित पीडित मुलीचे व्हिडीओ व्हायरल करून तिची ओळख सार्वजनिक करणाऱ्या काही युट्युबर्सवर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीचा भंग केल्या मुळे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या बलात्काराच्या प्रकरणामुळे तेलंगणातील वातावरण सध्या तापलेलं दिसतंय. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला विरोधी पक्ष भाजपने चांगलच धारेवर धरलं आहे. एआयएमआयएम तसेच टीआरएसचा पोलिसांवर दबाव आहे म्हणूनच निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी, अशी मागणी काँग्रेस व भाजपने केली आहे.