कोणाकोणाकडे भीक मागणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2022   
Total Views |

ss
  
 
दहशतवाद्यांचे जन्मस्थान पाकिस्तान व पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता शेवटच्या घटका मोजत असल्याच्या ताज्या घडामोडींवरून दिसते. कोणतेही विधायक, लोकोपयोगी, विकासाचे काम न करता फक्त दहशतवाद्यांनाच पोसल्याने पाकिस्तानला आता उद्ध्वस्त होण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. मोठ्या प्रमाणावर घटलेली परकीय गंगाजळी आणि वाढत्या परकीय कर्जामुळे पाकिस्तान दिवाळखोरीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानला त्याच्या ज्या दोस्तांकडून मदतीची अपेक्षा होती, तेदेखील त्याला लाथाडतच असल्याचे दिसते. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तानला जागतिक नाणेनिधीनेदेखील आर्थिक पॅकेज देणार नाही, असे बजावले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान ज्या देशांच्या भरवशावर होता, तेही त्याच्याकडे दुर्लक्षच करू लागले आहेत.
 
 
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या गंभीर संकटात सापडलेली आहे. देशाचे परकीय चलन सातत्याने घटतच आहे. ऑगस्ट २०२१ पासून पाकिस्तानची परकीय गंगाजळी पार निम्म्यावर आली आहे. पाकिस्तानची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, पाकिस्तान सरकार केवळ चार आठवड्यांपर्यंतचीच आयात करू शकते. त्यावरुन पाकिस्तानमधील नवे शाहबाज शरीफ सरकार देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात संपूर्णपणे अपयशी ठरल्याचे सिद्ध होत आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, तो देश पुढचा श्रीलंका होण्याकडे धावत-पळत जात आहे, अशा परिस्थितीत देश वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार जागतिक नाणेनिधीकडे भीक मिळेल या आशेने डोळे लावून बसले आहे. पण, जागतिक नाणेनिधीनेदेखील पाकिस्तानला इतक्या वेळा भीक दिलेली आहे की, आता जागतिक नाणेनिधी पाकिस्तानला आणखी भीक देण्याच्या विचारात नाही. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानच्या एका अहवालानुसार,गेल्या महिन्यात म्हणजे २७ मे रोजी पाकिस्तानकडील एकूण परकीय चलन साठा ९.७२ अब्ज डॉलर्स इतका खाली आला आहे. अर्थात, त्यालाही आता एक आठवड्याचा कालावधी उलटून गेला असून त्यात आणखी घटच झाली असल्याची शक्यता अधिक. यावरुनच पाकिस्तान किती भयंकर आर्थिक संकटात सापडलेला आहे, हे स्पष्ट होते.
 
 
दहशतवाद्यांना पाळून, धर्मांध विचारांना खतपाणी घालून, भारतविरोधी कारवाया करुन झाल्या की, पाकिस्तानला अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याचे लक्षात येते. तेव्हा तो देश संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया किंवा चीनसारख्या देशांपुढे हात पसरतो. कोणीतरी आपल्याकडे दोन पैसे फेकेल आणि त्यावर काही दिवस आपली गुजराण होईल, असे पाकिस्तानला वाटते. आताच्या वाईट परिस्थितीतही पाकिस्तानने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि चीनकडे आर्थिक मदतीची मागणी केली. पण, या देशांनी पाकिस्तानला आधीच प्रचंड मदत केलेली आहे, पण त्याची व्यवस्थित परतफेड पाकिस्तान करू शकलेला नाही. ते पाहता या देशांनी आता पाकिस्तानलाही कसलीही मदत करायला नकार दिलेला आहे. जागतिक नाणेनिधीने आधी पाकिस्तानचे कर्ज मंजूर करावे, त्यानंतरच आम्ही थोडीफार मदत करू, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात, आता पाकिस्तानची अखेरची आशा फक्त आणि फक्त जागतिक नाणेनिधीकडूनच आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता जागतिक नाणेनिधीसमोर कटोरा घेऊन उभा आहे, भीक देण्यासाठी मनधरणी करत आहे. तथापि, जागतिक नाणेनिधीदेखील पाकिस्तानची मागणी मान्य करेल, असे वाटत नाही. मात्र, पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका तिथल्या सर्वसामान्यांना बसत आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचे सर्व विक्रम मोडीत निघाले असून, सर्वसामान्यांची जिंदगी नरक झाली आहे. इथली जनता दाण्या-दाण्याला महाग झाली आहे. महागाईची परिस्थिती इतकी बिकट आहे की, एकाच आठवड्यात पेट्रोलची किंमत १४० रुपयांवरुन २०० रुपये लीटरपलीकडे गेली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान भीषण आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणखी कोणा-कोणापुढे झोळी पसरून उभा राहील, कशाप्रकारे या परिस्थितीतून बाहेर पडेल की, येणार्‍या काळात दुसरा श्रीलंका म्हणून समोर येईल, हे पाहावे लागेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@