‘परिसांचा संग’ - अवलियांचा परिचय करून देणारे पुस्तक

    05-Jun-2022
Total Views | 86

parisancha saanga.png
 
 
 
 
 
सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी जी जी माणसे पाहिली, अनुभवली त्या माणसांच्या अंतरंगाचा पट ‘परिसांचा संग’ या पुस्तकात अतिशय आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने रंगवला आहे. ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांच्या साहित्याचा, समाजजीवनाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांचे सर्वाथाने असणारे माणसांवरील प्रेम. लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न मानता त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली, जोडत आहेत. एकूणच त्यांचा पिंडच ‘माणुसकी’ने भरलेला आहे.
 
 
 
सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि माणसांबद्दलची ओढ यातून गिरीश प्रभुणे यांनी ‘परिसांचा संग’ या पुस्तकातून अनेकविध व्यक्तींचे दर्शन घडविले आहे. प्रभुणे यांची आत्मनिष्ठा निरामय, उत्कट व अविचल झालेली पाहायला मिळते, त्यामुळे त्यांच्या या संग्रहात पुढील बाबी प्रकर्षांने जाणवतात- १. व्यक्तींचे समाजातील स्थान व व्याप्ती २. व्यक्तींचे समाजातील कार्य ३. व्यक्तींचा समाजावर होणारा परिणाम ४. व्यक्तीला सामाजिक दस्तावेज म्हणून कसे पाहावे, याचे दर्शन घडते. प्रभुणे यांच्या जीवनात जी माणसे आली, ज्यांनी त्यांच्या मनावर अमीट असा ठसा उमटवला, त्या माणसांच्या जीवनसौंदर्याची ओळख करून देणे हाच या पुस्तकामागील मुख्य हेतू आहे. त्यांनी आपल्या विषयासाठी निवडलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या स्तरांतल्या, विविध विचारधारांमधल्या, पठडीतल्या निवडल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रभुणे यांनी या संग्रहातील सर्व व्यक्तींच्या बाह्यांगाचा परिचय करून न देता अंतरंगाची ओळख करून दिलेली आहे.
 
 
 
मोरोपंत पिंगळे, किशाभाऊ पटवर्धन, दत्तोपंत ठेंगडी, नाना नवले, बाळासाहेब देवरस, डॉ. अशोक कुकडे, रमेश पतंगे, नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे, आर.आर. पाटील, डॉ. कालबाग, डॉ. देवदत्त दाभोळकर, नरेंद्र जाधव, सुनील देशपांडे, भीमराव गस्ती, धर्मपाल, कवी ग्रेस, गो. नी. दांडेकर, आनंद यादव, रवींद्र शर्मा, शाहीर आसाराम कसबे, इंदुमती काटदरे अशा ४३ व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेले लेख प्रस्तुत संग्रहात आहेत. ही सारीच माणसे निर्विवादपणे मोठी आहेत. मात्र, सगळ्यांच्याच कामाची हवी तशी दखल समाजाने घेतलेली नाही. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरांतील लोकांना त्यांच्या कामाची, त्यांच्यातल्या वेगळेपणाची माहिती असेलच, असे नाही. राजश्री काळे, सुजाता गणवीर, महादेव सरडे, रावसाहेब कुलकर्णी, डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. कालबाग, शाहीर असाराम कसबे ही त्यातील ठळक उदाहरणे. पारधी समाजात जन्माला आलेल्या राजश्री काळे यांची कहाणी चित्तथरारक आहे. यमगरवाडीत त्यांना मिळालेल्या दिशेतून राजश्री यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. आज त्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. मूळच्या नागपूरच्या, पण सध्या यमगरवाडीच्या मातीत रमून गेलेल्या सुजात गणवीर यांचे साधे-सरळ जगणे लेखकाला कसे आपलेसे वाटते, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपला समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. अनेेक गोष्टी शिकवत असतो.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अविरतपणे काम करणारे असंख्य संघस्वयंसेवक एक प्रकारे समाजऋण फेडत असतात. महादेवराव सरडे व रावसाहेब कुलकर्णी हे त्यापैकीच. या दोन व्यक्तींनी ‘यमगरवाडी’ प्रकल्पासाठी घेतलेले कष्ट, सोसलेला संघर्ष प्रभुणे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून सांगतात. २५-३० वर्षांपूर्वी पाबळच्या टेकडीवर विज्ञान आश्रम सुरू करणारे व दुष्काळी भागात कौशल्यावर आधारित शिक्षणाचे प्रयोग करणारे व ‘विज्ञान आश्रम’ या आगळ्यावेगळ्या आधुनिक गुरुकुलाचे जनक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांच्याबद्दलही सामान्य वाचकाला फारशी माहिती नाही. डॉ. कलबाग यांनी यमगरवाडीला दिलेला भेट आणि यातून निर्माण झालेला स्नेहाचा धागा याविषयीचे चित्रण वाचायला मिळते. समाजाप्रती समर्पण भावनेने काम करणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे व आर. आर. पाटील यांच्याविषयी आठवणी प्रभुणे यांनी आपल्या पुस्तकातून सांगितलेल्या आहेत. ‘संघात न आलेला स्वयंसेवक’ या शीर्षकातून आर. आर. पाटील यांच्या ऋजू स्वभावाचे दर्शन घडविले आहे. पक्ष-विचारधारा याविषयी कोणताही भेद न करता आर. आर. आबांना ‘गुरुकुलम’ संस्थेच्या मान्यतेचा आग्रह धरला, याविषयी मनस्वी व्यक्तिमत्त्वाच्या आबांच्या स्वभावातले अनेक पैलू प्रभुणे यांनी अत्यंत सुरेखपणे उलगडून दाखविले आहेत.
 
 
 
सतत आपल्या कामात बुडालेले आणि समाजाच्या भल्यासाठी सतत धडपड करणारे आर.आर. पाटील हे संघात कधीही न आलेले, शाखेत न आलेला संघस्वयंसेवक म्हणून आबांचे वर्णन केलेले आहे. देवदत्त दाभोळकर हे तसे समाजवादी. पण, त्यांच्या जगण्यात कुठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेश नाही, विचारवंत असूनही अहंकाराचा कुठेही स्पर्श न झालेल्या या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रभुणे यांनी घडविले आहे. नितीन गडकरी, विनोद तावडे, लता मंगेशकर, सुनील देशपांडे, विष्णू वाकणकर, गो. नी. दांडेकर, सुभाष अवचट आदी व्यक्तींच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न प्रभुणे यांनी केलेला आहे. नेटके आणि गोळीबंद लेखण करणारे प्रभुणे यांची लेखनशैली ओघवती, सच्ची, सुगम असल्याने, त्यांचे पुस्तक अगदी सामान्य वाचकाला आपलेसे करते. पुस्तकातील व्यक्तींचे रेखाचित्र आणि त्याला साजेसे शीर्षके हे पुस्तकाचे आणखीन एक बलस्थान. मराठी साहित्यात प्रथमच विविध विचारधारांतील, विषयांतील व्यक्तित्वांचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे. त्यामुळेच विषयाच्या वेगळेपणामुळे आणि अनुभवांच्या अस्सलपणामुळे, नेटक्या मांडणीमुळे हे पुस्तक सर्वांगांनी उठून दिसते.
 
 
 
पुस्तकाचे नाव : परिसांचा संग
लेखक : पद्मश्री गिरीश प्रभुणे
प्रकाशन : साप्ताहिक विवेक
पृष्ठसंख्या : २००
मूल्य : ३००/-
पुस्तकासाठी संपर्क : ९५९४९६१८५८ / ९९७०४५२७६७
 
 
 
- विकास पांढरे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121