इमारत दुर्घटनांचे सरकारी बळी

राजकीय अंधश्रद्धांची अघोरी वाणी

    30-Jun-2022   
Total Views |
kurla
 
 
 
 
दरवर्षी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात हमखास ऐरणीवर येतो तो धोकादायक इमारतींचा प्रश्न. या गंभीर प्रश्नावर दरवर्षी चर्चांचे गुर्‍हाळ रंगते, नेतेमंडळींकडून उपाययोजनांची आश्वासनेही दिली जातात. परंतु, तरीही त्यावर कठोर आणि ठोस कारवाई होताना मात्र अभावानेच होताना दिसते. मुंबईतील परवाच्या कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेत 21 जणांचा बळी गेल्यानंतर, या दुर्घटना पूर्णपणे थांबणार तर कधी, असाच प्रश्न उपस्थित होतो.
 
 
 
मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी अशा धोकादायक वर्गवारीतील इमारतींना नोटिसा पाठविल्या जातात. रहिवाशांनी इमारती लवकरात लवकर खाली कराव्या, यासाठी विनंती, विनवण्यांचे सोपस्कारही पार पडतात. परंतु, बरेचदा रहिवाशांच्या पर्यायी निवार्‍याची व्यवस्थाच न झाल्याने किंवा त्यांना माहुलसारख्या मुंबईच्या एका कोपर्‍यात घरे देऊ असे सांगितल्यानंतरही हे रहिवासी जीव मुठीत घेऊनच त्याच ठिकाणी जगणे पसंद करतात. पावसाळा आला की, या धोकादायक इमारतींचा प्रश्न ज्वलंत होतो. पण, त्यानंतर पुन्हा सरकारही निर्धास्त आणि रहिवाशीही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. पण, काळ सांगून येत नाही आणि म्हणूनच अशा दुर्घटनांमध्ये मुंबईकरांचा हकनाक बळी जातो.
 
 
एका आकडेवारीनुसार,2013 ते 2019 या काळात मुंबईत इमारत दुर्घटनांच्या विविध प्रकारच्या 3 हजार, 707 घटनांची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनांमुळे 291 नागरिकांना आपले जीव गमवावे लागले, तर जखमींची संख्याही एक हजारांच्या घरात आहे. यावरुन मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न किती गंभीर आहे, ते लक्षात येते. पण, तरीही मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा दरवर्षी ‘आम्ही धोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटिसा दिल्या’ म्हणून हात झटकण्याचा मुर्दाडपणा, निलाजरेपणा ‘जैसे थे’च दिसतो. त्यामुळे पालिकेने नुसत्या नोटिसा, आश्वासने अशी वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याची नितांत गरज आहे. तसे झाले नाही, तर राज्याची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीला लागलेला अशा दुर्घटनांचा कलंक कदापि पुसता येणार नाही. तेव्हा या स्वप्ननगरीतील नागरिकांचे स्वप्नांचे घर तरी किमान सुरक्षित राहावे, म्हणून पालिकेने आता तरी वेळीच जागे होऊन हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, हीच अपेक्षा!
 
 
राजकीय अंधश्रद्धांची अघोरी वाणी 
 
 
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू असून नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पुढील काही दिवस तरी त्याचा परिणाम जाणवणार, हे नक्कीच. पण, या सगळ्या हायव्होलटेज राजकीय नाट्यांत महाराष्ट्रातील राजकारणी मंडळींनी केलेल्या काही विधानांवर नजर टाकली तर आपले राज्य खरंच पुरोगामी विचारांचे आहे का, असाच प्रश्न पडावा. राजकीय विरोध, मतभेद आणि टीका हे राजकारण म्हटल्यावर ओघाने आलेच. पण, संजय राऊतांसारख्या नेत्यांनी मागील काही दिवसांत बंडखोरांबद्दल वापरलेली एकूणच भाषा पाहिली की, हा माणूस आपल्या देशाचा राज्यसभेतील खासदार आहे, यावर क्षणभर विश्वासच बसत नाही.
 
 
‘बंडखोरांच्या गुवाहाटीतून बॉड्या येतील, त्यांच्यावर जादूटोणा केलाय, ते रेडे आहेत, त्यांना बळी द्यायला गुवाहाटीला पाठवले आहे, कामाख्या मंदिर म्हणजे जादूटोण्याचे मंदिर, एकनाथ शिंदे तोंडात पांढरी गोळी ठेवतात व समोरच्याला वश करतात’ वगैरे वगैरे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी वक्तव्य संजय राऊत व अन्यही काही शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली. आता ही वक्तव्यं या मंडळींनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी म्हणून अगदी सहज झाडून दिली असली तरी महाराष्ट्राच्या समाजमानसावर त्याचे काय परिणाम होतील, याचा क्षणभरही विचार या राज्यकर्त्यांना करावासाही वाटला नाही, हेच खरे!
 
 
 
एकीकडे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या नरेंद्र दाभोलकरांची शिकवण सांगणारा, ‘अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम’ कायदा करणारा आपला महाराष्ट्र. पण, आज त्याच महाराष्ट्रातील नेतेमंडळी जादूटोणा आणि बळीची भाषा करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? राजकारणी हे असलं सगळं मानतात आणि जादूटोणाही करतात, असे ऐकून, वाचून, बघून महाराष्ट्रातील खासकरून अशिक्षित, अंधश्रद्धाळू जनतेनेही ‘राजकारण्यांनी हे सगळे केले तर चालते, मग आम्हीही करू’ असा विचार करून कृतीही केली, तर त्याला नेमके जबाबदार कोण? त्यात राऊतांनी काल ‘माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो’ असे म्हटले तरी आता उपयोग शून्य! कारण, राऊतवाणीने जे नुकसान व्हायचे होते, जे घडवायचे होते, ते शेवटी झालेच!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची