मुंबई: राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उप मुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही. असे शिवसेनेच्या शिंदे गटातील शंभूराजे देसाई यांनी म्हंटले आहे. याबाबतचा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदेंसोबत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. आमदारांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित ठेवल्यामुळे हे आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, आमदारांकडे लक्ष देत नाहीत असे अनेक आमदारांचे म्हणणे आहे. शंभूराज देसाई हे पाटण तालुक्यातले आमदार आहेत. ते गृह (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, पणन, कौशल्य विकास या पाच विभागांचे राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्याला या खात्यांमधील कामाच्या शिफारसी कॅबिनेट मंत्र्यांकडे करण्यापलीकडे कोणतेही अधिकार नाहीत. "नामधारी राज्यमंत्री म्हणून आम्ही काम करत होतो. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा भेटून राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवून देण्याबाबत विनंती केली. परंतु अडीच वर्षात काहीच घडले नाही.
पणन विभागाचा कामकाज वाटपाचा आदेश आज पर्यंत निघालेला नाही. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ व वित्त राज्य मंत्री नात्याने याची शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत घोषणा केली. यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्यमंत्री या नात्याने शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री - अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाहीत.
दोन वेळा हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर सांगितला, परंतु काहीच घडले नाही. वित्त नियोजन राज्यमंत्री असून देखील मतदारसंघाच्या कामांसाठी अर्थ संकल्पात तरतुदी करण्यासाठी उपमुख्यमंत्री - अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने विनवणी करावी लागायची. "जेव्हा युतीचे सरकार होते, तेव्हा मी आमदार होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात होते. यादरम्यान जेवढा निधी आणू शकत होतो, तेवढा सुद्धा निधी राज्यमंत्री म्हणून आणू शकलो नाही." असे ते म्हणाले. वित्त नियोजन राज्यमंत्र्याची ही वस्था असेल तर बाकीच्या आमदारांनी काय बोलावे? असा सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. या वस्तुस्थिती बाबत मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा सांगितले. परंतु काहीच घडले नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, गटनेता हा बहुमताने निवडला जातो. आमचे गटनेते एकनाथ शिंदे आहेत. आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार आहोत असे शंभूराज देसाई म्हणाले.