एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्याचे राजकीय परिणाम दिसून येतील, यात शंका नाही. तेव्हा, शिंदे यांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा कानोसा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
शिवसेनेसमोर मुंबई महापालिका राखण्याचे आव्हान!
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे जर शिवसेनेला नाईलाजास्तव काही अप्रिय निर्णय घ्यावा लागला, तर त्याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. २०१७ पासून सातत्याने महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणार्या भाजपचे मनोधैर्य शिवसेनेतील अंतर्गत संघर्षामुळे वाढण्याची शक्यता असून, निवडणुकीत भाजप आणखी त्वेषाने उतरला, तर त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता गाजविणार्या सेनेसमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
यशवंत जाधव शिंदेंच्या गळाला
कोट्यवधींच्या आर्थिक अफरातफरीमुळे चौकशीच्या गोत्यात आलेले मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हे देखील एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. जाधव यांच्या पत्नी आणि भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असून त्या शिंदे गटासोबत गुवाहाटी येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यशवंत जाधव यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या छापेमारीमुळे आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या व्यवहारांमुळे पालिकेतील सत्ताधारी आणि कंत्राटदारांमधील ’अर्थपूर्ण’ संबंध आपसुकच समोर आले होते. तसेच यशवंत जाधव यांच्या डायरीत ’केबलमॅन’ला दिलेल्या कोट्यवधी रुपयांविषयी आणि ’मातोश्री’ दिलेल्या ५० लाखांच्या घड्याळाच्या उल्लेखामुळे या आर्थिक गैरव्यवहाराचे संबंध थेट पक्षातील मोठ्या नेत्यांशी जोडले जात होते.
शिवसेनेचा चेहरा आहे कुठे?
मुंबई महापालिकेत विरोधकांची भूमिका पार पडणार्या भाजपच्या आक्रमक हल्ल्यांना एकमुखी प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडे नेमका कुठला चेहरा आहे, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यशवंत जाधव हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुरफटलेले आहेत, तर माजी महापौर किशोरी पेडणेकर वगळता इतर कुठला नेता भाजपशी भिडायला तयार नाही. त्यामुळे मुंबईत अधिकाधिक प्रभावशाली होत चाललेल्या भाजपला रोखण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडे नेमका चेहरा आहे कुठे, याचे उत्तर शिवसेनेला शोधावे लागणार आहे.
फटका बसणार नाही
“राजकीय पक्षाच्या वाटचालीत अशा प्रकारचे चढउतार येत असतात. पक्षाच्या विरोधात गेलेल्या काही लोकांमुळे पक्षाला फारसा फरक पडत नाही. आम्ही पक्ष म्हणून मुंबईकरांशी बांधले गेलेले आहोत. अशा प्रकारच्या बंडामुळे पक्षात अस्वस्थता नक्की निर्माण होईल, पण त्याचा निवडणुकीत परिणाम जाणवणार नाही,’ अशी भावना शिवसेनेच्या काही महत्त्वपूर्ण पदाधिकार्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.
कोकणातही शिंदेंच्या गटाला शिवसैनिकांचे समर्थन
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील तब्बल दहा आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात पालघरमधील एक, ठाण्यातील पाच, रायगडमधील तीन आणि दापोलीतील एक आमदारांचा यामध्ये समावेश आहे. यात आ. श्रीनिवास वनगा, बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, प्रताप सरनाईक आणि नव्याने सामील झालेले योगेश कदम हे शिंदेंसोबत सध्या गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर असणारी युती शिवसेना संपवते आहे हीच ओरड या आमदारांकडून वारंवार होताना दिसते. याच नाराजीतून शिंदे गट एकत्र आहे. दापोलीत योगेश कदम आणि त्यांचे वडील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.
योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार असून मुख्य विरोधक राष्ट्रवादीचे संजय कदम आहेत. रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत हे आमदार असून, राष्ट्रवादी इथे प्रमुख विरोधक आहे. चिपळूणमध्ये शेखर निकम हे राष्ट्रवादीचे आमदार इथून निवडून आले असले, तरी इथे शिवसेनेचीही ताकद आहे. सदानंद चव्हाण हे शिवसेना नेते या मतदारसंघात प्रमुख विरोधक आहेत. गुहागरमधून भास्कर जाधव हे या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. या मतदारसंघातही दुसर्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे. सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे वेळोवेळी या नेत्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक भागात शिंदेच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. स्थानिक पातळीवरही शिंदे यांना अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे समर्थन असून शिवसेनेचे काही खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा कोकणात दबक्या आवाजात सुरु आहेत.
मराठवाड्यातील आठ आमदार शिंदेंसोबत; तर पश्चिम महाराष्ट्रातही सेनेला धक्के!
नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारपेक्षाही शिवसेनेला अधिक जोरदार झटका बसला आहे. मागील अडीच वर्षांपासून टिकवून ठेवलेली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आपल्याच साथीदारांमुळे गमावल्याच्या झटक्यातून शिवसेना अद्याप सावरू शकलेली नाही. शिंदेंच्या या बंडात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्याने मोठी भूमिका बजावली असून, शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांमध्ये मराठवाड्याचे आमदार मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत. ’मातोश्री’च्या आदेशाची संस्कृती ‘फॉलो’ करणार्या सेनेत एकनाथ शिंदेंना मिळणारा आमदारांचा पाठिंबा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात शिवसेनेच्या तब्बल ३४ आमदारांची त्यांना साथ मिळाली असून, त्या ३४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्रदेखील समोर आले आहे. शिंदेंच्या या बंडात मराठवाड्याच्या आमदारांनी मोठा हातभार लावला आहे. कारण, एकट्या मराठवाड्यातील शिवसेनेच्या १२ आमदारांपैकी आठ आमदार शिंदेंच्या सोबत आहेत. विशेष म्हणजे, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांमध्ये औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे रमेश बोरनारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर या आठ आमदारांचा समावेश आहे.
बालेकिल्ल्याला भगदाड
मुंबई पाठोपाठ ठाणे, कोकण व मराठवाडा म्हणजे औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, या बंडाळीने तेथे शिवसेनेला ग्रहण लागले आहे. औरंगाबादने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना चार वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून दिले होते, तर सुमारे २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून औरंगाबाद महापालिकेची सत्तादेखील शिवसेनेकडे आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबादेत एकूण नऊपैकी शिवसेनेचे सहा आमदार शिवसेनेचे निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या या बालेकिल्ल्याला शिंदेंच्या बंडाळीमुळे मोठे भगदाड पडले आहे.
पश्चिम महाराष्ट्राचीही शिंदेंना साथ
बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये कोकणमधील नऊ आमदारांचा समावेश आहे. पालघर एक, ठाणे पाच आणि रायगडमधील तीन आमदारांचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हेसुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडीचे अनिल बाबरही सामील झाले आहेत. कोल्हापूरचे एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि सोलापूरमधील शहाजी पाटील हे देखील गुवाहाटीत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातही शिंदेे समर्थकांचीच सरशी
बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत शिवसेनेचे कार्यकर्ते आकर्षित झाले. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांत शिवसेनेने राज्याला अनेक मंत्री, नेतेही दिले. उत्तर महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी शिवसेना अर्थोअर्थी रुजवली. आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ सहकार क्षेत्रात नावाजलेले बाळासाहेब विखे, सुरेश जैन, आर. ओ. पाटील इत्यादी नेत्यांचा यात समावेश आहे. अर्थात, या सर्वांचे एकनाथ शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध होतेच व त्यामुळेच याचे पडसाद त्यांना समर्थन देण्यात या भागातील आमदारांच्या सहभागाने आज उत्तर महाराष्ट्रात उमटले आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यातील चारपैकी जवळ जवळ चारही शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. या भागातील शिवसेनेचे ‘फायरब्रॅण्ड’ नेते व आताचे मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील गुवाहाटीला शिंदे गटासोबत असल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेना आमदार लता सोनवणे, पाचोराचे आमदार किशोर पाटील, एरंडोलचे चिमणराव पाटील हे तीन आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत.
गुलाबराव हे जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत. ते जर खरोखर शिंदेंसोबत आले, तर ही संख्या चार होते. विशेष म्हणजे, शिंदे यांच्याप्रमाणेच गुलाबराव हेदेखील बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके कार्यकर्ते. त्यांचे अनेकदा त्यांनी जाहीरसभेत कौतुकही केले होते. एक ‘मास लीडर’ म्हणून ते परिचित आहेत. जळगाव महापालिकेत भाजप आमदार फोडून शिवसेना सत्तेत आणण्यात देखील त्यांचा वाटा होता. विशेष म्हणजे, हे भाजप नगरसेवक त्यावेळी शिंदे यांच्या ठाणे परिसरात होते. आज या जिल्ह्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि पर्यायाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे. नाशिक जिल्ह्यातून सुहास कांदे देखील शिंदे यांच्यासोबत आहेत. या भागात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पराभूत करणारे अपक्ष आमदार जे आधी शिवसेनेत होते, त्या चंद्रकांत पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघात निवडून आलेल्या मंजुळा गावित या अपक्ष आमदारदेखील शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल होत असल्याचे चित्र आहे. यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांनी आपल्या असंतोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास निश्चितच उत्तर महाराष्ट्रात ठाकरेेंना मोठा फटका बसू शकतो. पाचोरा, अमळनेर, एरंडोल तसेच जळगाव महापालिका जिल्हा सहकारी बँक, बाजार समित्या या निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
विदर्भात आ. संजय राठोडांसह समर्थकांचा शिंदेंना पाठिंबा
विदर्भात शिवसेनेचे पक्षीय बलाबल आणि ताकद कमी असली तरीही यवतमाळच्या दिग्रसमधील आमदार संजय राठोड यांचा दबदबा अधिक आहे. अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संजय राठोड यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विदर्भातूनही शिंदे यांच्या विरोधात कुठेही निदर्शने किंवा आंदोलन करताना शिवसेना दिसली नाही. कारण, यापूर्वी संजय राठोड यांच्या समर्थनात एका गंभीर विषयात शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले दिसले होते. यावेळी मात्र चित्र काहीसे वेगळे आहे.