नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात दोन्ही मंत्र्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांचे सहकार्य मजबूत असून ते अधिक वाढविण्याविषयी चर्चा करण्यात आली. दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान असलेल्या सर्वंकष राजनैतिक भागीदारीच्या संरक्षण आणि सुरक्षा पैलूंवर चर्चा केली.
सामायिक हितसंबंध आणि लोकशाहीची सहकारी मूल्ये, कायद्याचे राज्य, परस्पर विश्वास आणि सामंजस्यावर आधारित सर्वंकष राजनैतिक भागीदारीची अंमलबजावणीविषयीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही देशांदरम्यान वाढत असलेल्या विविध संरक्षण कवायती आणि देवाणघेवाण याचे स्वागत केले, तसेच भारत-ऑस्ट्रेलिया परस्पर ‘लॉजिस्टिक’ मदत व्यवस्थेद्वारे क्रियान्वयन करण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण संशोधन आणि सामुग्री सहकार्याविषयीच्या भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्य गटाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला, ज्याची बैठक या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. संरक्षण उद्योगातील सहकार्य वाढविण्यासाठी संयुक्त कार्यगट अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान असलेल्या औद्योगिक सहकार्याविषयी दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. ज्यात पुरवठा साखळ्या अधिक मजबूत करणे आणि आपल्या संबंधित संरक्षणदलांना पूर्ण क्षमतेने मदत करणे याचा समावेश होता.
यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षणविषयक संबंध आणि संधी यांचा विस्तार करण्याबद्दल सहमती दर्शवली. ‘जनरल रावत युवा अधिकारी आदानप्रदान कार्यक्रम’ या वर्षीच्या दुसर्या सहामाहीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या २१ मार्च रोजी झालेल्या आभासी बैठकीत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. तसेच, दोन्ही देशांसमोर असलेली रणनीतिक आव्हाने आणि प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. खुल्या, मुक्त, एकात्मिक, समृद्ध आणि नियमांवर चालणार्या हिंद-प्रशांत महासागर प्रदेशाची उभारणी करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.